जवळपास दहा वर्षांनंतर अभिनेत्री काजोल पती अजय देवगणसोबत चित्रपटात भूमिका साकारणार आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या ऐतिहासिकपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अजय-काजोल हे ऑनस्क्रीन पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अजय साकारत असून काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी काजोलने बरीच मेहनत घेतली असून ती पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रपटात काजोल नऊवारी साडी, डोक्यावर पदर, नथ अशा मराठमोळा लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने नऊवारी साडीतली एक खास आठवण काजोलने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

“मी सात-आठ वर्षांची असताना शाळेतल्या नाटकात सहभाग घेतला होता. अभिनयाची आवड तेव्हापासूनच होती. त्या नाटकासाठी मी नऊवारी साडी पहिल्यांदा नेसली होती. त्या साडीतला फोटो माझ्याकडे आणि आईकडेसुद्धा आहे. नऊवारी साडीतली माझी सर्वांत खास आठवण माझ्या लग्नातली आहे. माझ्या लग्नातल्या फोटोंमध्ये तुम्ही मला मराठमोळ्या लूकमध्ये पाहिला असाल. ती आठवण माझ्यासाठी खूप खास आहे”, असं काजोलने सांगितलं.

नऊवारी साडीची आठवण सांगतानाच संपूर्ण शूटिंग त्या साडीत करणं खूप कठीण असल्याचंही म्हटलं. “एखाद्या कार्यक्रमासाठी साडी नेसणं आणि सेटवर नऊवारी साडी नेसून संपूर्ण चित्रपटाची शूटिंग करणं खूप वेगळं आहे. रोज साडीत तयार होऊन मी जेव्हा आरशात स्वत:ला बघायचे तेव्हा मला वाटायचं की ही मी नाही. ती भावना फार छान होती”, असं ती म्हणाली.

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.