एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अस्तित्व आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई बाहेर होत आहे. नाट्य चळवळीचे नवे केंद्र असलेल्या कल्याणमध्ये ही अंतिम फेरी पार पडणार आहे. येत्या १३ ऑक्टोबरला नूतनीकरण झालेल्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ही स्पर्धा संपन्न होईल. यंदाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कल्याणची चारमित्र ही संस्था ‘अस्तित्व’ सोबत स्पर्धेची सहआयोजक आहे.

आयोजक, सादरकर्ते, पाठराखे मायबाप प्रेक्षक आणि प्रायोजक हे चार महत्त्वाचे घटक एकत्र आले की, त्यातून उत्तम कलाकृतीची निर्मिती होते. यापैकी एकही दुवा निखळला तर परिपूर्ण कलाकृती सादर केली जाऊ शकत नाही. त्यामुळे या चार मित्रांना एकत्र आणत त्यांची चारमित्र ही संस्थाच कल्याणातील नाट्यप्रेमींनी स्थापन केली. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने केले आहे. ठाणे जिल्ह्यात नाट्य चळवळीला वेगळी दिशा देण्याच्या त्यांच्या उद्दिष्टात कल्पना एकच्या सहआयोजनाने नवा आयाम आला आहे.

यंदाची ही स्पर्धा विशेष चर्चेत आहे ती संवेदनशील कवी, नाटककार, अभिनेते पियुष मिश्रा यांच्या ‘जब शहर हमारा सोता है’ या समकालीन विषयामुळे. विशेष म्हणजे या विषयाची कोणतीही प्रस्तावना त्यांनी दिली नसून हा विषय इतका दैनंदिन आहे कि लेखक आपोआप लिहते होतील, असा विश्वास त्यांना आहे. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे. यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३२ वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात. स्पर्धेची प्राथमिकफेरी ६ ऑक्टोबरला मुंबईत तर अंतिमफेरी १३ ऑक्टोबरला कल्याण येथे संपन्न होईल. स्पर्धेचे प्रवेशअर्ज http://www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.