अभिनेत्री कंगना रनौत लागोपाठ वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत येत असते. यंदा ती पासपोर्ट रिन्यूअलच्या विषयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिच्या पासपोर्ट रिन्यूसाठी न्यायालयात परवानगी मागितली असता न्यायालयाने २५ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे वैतागलेल्या कंगना रनौतचा राग काही शांत होण्याचं नाव घेत नाही. हा राग तिने आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानवर काढलाय.

अभिनेत्री कंगना रनौतने कू अ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला राग व्यक्त केलाय. यावेळी तिने असहिष्णुता या मुद्द्यावर बोलताना अभिनेता आमिर खानवर निशाणा साधलाय. कू अ‍ॅपवर तिने लिहिलंय, “‘महाविनाशकारी’ सरकारने मला पुन्हा त्रास द्यायला सुरवात केली…माझ्या पासपोर्ट रिन्यूसाठी केलेल्या अर्जाला नाकारण्यात आलं. कारण एका टपोरी-रोडसाईट रोमियोने माझ्याविरोधात देशद्रोहची तक्रार दाखल केलीय.” “माझ्या पासपोर्ट रिन्यूसाठीच्या अर्जात अस्पष्टता असल्याचं कारण देत कोर्टाने तो अर्ज नाकारला…”, असं देखील यावेळी कंगनाने सांगितलं.

याच पोस्टला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना मात्र तिने अभिनेता आमिर खानवर राग काढला. इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिताना कंगना म्हणाली, “लक्षात घ्या…जेव्हा आमिर खान भाजपच्या विरोधात बोलला आणि असहिष्णुताच्या मुद्द्यावर बोलला, त्यावेळी ना कुणी त्याच्या चित्रपटाची शूटिंग नाही थांबवली, ना कुणी त्याचा पासपोर्ट नाकारला.”

kangana-ranaut-got-angry-on-aamir-khan
(Photo: Koo App@ kanganarofficial)

२०१५ मध्ये झाला होता जबरदस्त वाद

२०१५ साली अभिनेता आमिर खानने एका मुलाखती दरम्यान भारतात वाढत चाललेल्या असहिष्णुता मुद्द्यावरील वाद विवादात सहभाग घेतला होता. अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यांच्या मुलांच्या सुरक्षेसाठी दुसऱ्या देशात स्थायिक होण्यासाठी नेहमीच सांगितलं जात असल्याचा खुलासा यावेळी अभिनेता आमिर खानने केला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. यावर नंतर अभिनेता आमिर खानने स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. त्याला म्हणायचं एक होतं आणि त्या वाक्याला घेताना अर्थ वेगळाच घेतला गेला, असं बोलून अभिनेता आमिर खानने त्याच्या वक्तव्यावर पांघरून घातलं.

कंगनाला तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या शूटिंगसाठी १५ जून ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत हंगेरी बुडापेस्ट येथे जायचं होतं. पण त्यासाठी ती जेव्हा पासपोर्ट ऑफिसला गेली तेव्हा पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी त्यांनी तिला न्यायालयाची परवानगी घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर कंगनानं न्यायालयात धाव घेतली मात्र तिथूनही तिला कोणतीच मदत मिळाली नाही. उच्च न्यायालयानं ही सुनावणी २५ जून पर्यंत पुढे ढकलली आहे.