आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येतोय. प्रत्येक जण योगाबद्दल बोलताना दिसून येतोय. बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने सुद्धा योगाबद्दल एक अनोखा दावा केलाय. आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त तिने एक पोस्ट शेअर करून योगा केल्याने तिच्या कुटुंबियांची प्रकृती कशी सुधारली हे सांगितलं.

अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे आई-वडील योगा करताना दिसून येत आहेत. यासोबतच योगामुळे तिची आई अवघ्या दोन महिन्यातच ठणठणीत झाली असल्याचं देखील तिने सांगितलं. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, “२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आणि मला माझी योगा स्टोरी शेअर करायची आहे. मी कसा आणि कधी योगा सुरू केला, हे सर्वांनाच माहितेय. पण माझ्या सर्व कुंटुंबाने कधी आणि कसा योगा सुरू केला, हे कुणाला माहित नाही. सुरवातीला काहींनी विरोध तर काहींनी स्विकार केला. काही वर्षापूर्वी माझ्या आईला डायबिटीस, थायरॉइड आणि हाय लेवल कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आरोग्य समस्या होत्या. डॉक्टरांनी तर तिला ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी सांगितलं होतं.”

यावेळी पुढे बोलताना कंगनाने सांगितलं, “डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिल्यानंतर डोळ्यात अश्रु आले आणि मी आईला म्हणाली, मला तुझ्या जीवनातले फक्त दोन महिने दे…त्यांच्या ह्दयावर इतकी मोठी सर्जरीची रिस्क घ्यायची नव्हती…माझ्यावर आईने विश्वास ठेवला आणि अखेर मी यात यशस्वी झाले. आज त्यांना कोणताच आजार नाही…ती आता आमच्या कुटूंबातील सर्वात निरोगी व्यक्ती आहे.”

यापुढे तिच्या वडिलांबद्दल बोलताना तिने सांगितलं, “जास्त चालल्यामुळे वडिलांचे गुडघे दुखत होते…त्यावेळेला मला आणखी एक संधी मिळाली आणि मी त्यांना योगा करण्याची सवय लावली. आता ते जॉगिंग सुद्धा करतात. आज मी हे गर्वाने सांगू शकते की मी माझ्या कुटुंबाला योगाचं गिफ्ट दिलंय. एक आनंदी कुटुंब…जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपल्याला सहज मिळते. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. आता प्रत्येक दिवशी सकाळी मी वडिलांना फोन करते आणि योगा केलंत का असा प्रश्न विचारते. आज त्यांनी मला हिमाचल प्रदेशमधून हे दोन फोटोज पाठवले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबाला काय देताय ?”

कंगना रनौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिचा ‘थलाइवा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तिचा हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. याशिवाय कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. यात तिचा अ‍ॅक्शन अवतार दिसणार असून ती एजंट अवनीची भूमिका साकारणार आहे. ‘तेजस’ चित्रपटात देखील दिसून येणार आहे. या चित्रपटात ती भारतीय वायुसेनामधील फायटर पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.