News Flash

कंगनाला ट्विटरकडून दणका; अकाऊंट कायमचं बंद

पश्चिम बंगालसंदर्भातील वादग्रस्त ट्विट्समुळे करण्यात आली कारवाई

देशातील वेगवेगळ्या घडामोडींवर सतत वादग्रस्त वक्तव्य करुन कायमच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइटपैकी एक असणाऱ्या ट्विटरने कंगनावर कारवाई करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कंगनाचं अकाऊंट कायमचं बंद करण्यात येत असल्याचंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. सोमवारी सायंकाळी कंगनाने केलेल्या या ट्विट्समध्ये अनेक वादग्रस्त आरोप करण्यात आलेले. त्यानंतर आज सकाळी कंगनाचे ट्विटर अकाऊंट वारंवार नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत कायमचं बंद करण्यात येत असल्याचं ट्विटरने जाहीर केलं. प्रत्यक्षात एखाद्याला दुखापत करण्यासंदर्भातील वक्तव्य करणं, द्वेष निर्माण करणारी आणि अश्लील तसेच दर्जाहीन भाषा वापरुन टीका करणं हे ट्विटरच्या पॉलिसीनुसार चुकीचं आहे. अशाच काही नियमांचे कंगनाने उल्लंघन केल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तृणमूलने विजय मिळवल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. बंगालमधील ममतांचा विजय हा रोहिग्यांचा आणि बांगलादेशी मुस्लिमांचा विजय आहे, अशा आशयाचं ट्विट कंगनाने पश्चिम बंगालमधील निकालांनंतर केलं होतं. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल रविवारी दोन मे रोजी लागले. त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग राज्यात तिसऱ्यांदा सत्ता मिळवली तर दुसरीकडे २०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला १०० जागांच्या आतच समाधान मानावलं लागलं. या निकालानंतर बंगालमध्ये हिंसक घटना घडल्या त्यासंदर्भातही कंगनाने ट्विट केले होते.

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाच्या वक्तव्यांमुळे पश्चिम बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्याचे कारण त्यावेळी देण्यात आले होते. कोलकात्याचे पोलिस आयुक्त सौमेन मित्रा यांना वकील सुमित चौधरी यांनी ईमेलद्वारे तक्रार केली होती. कंगनाच्या वक्तव्यांमुळे बंगालमधील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांचा अपमान केला आहे, असं सांगत तिच्याविरोधात चौधरी यांनी तक्रार दाखल केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:07 pm

Web Title: kangana ranaut twitter account has been suspended for violating twitter rules dcp 98
Next Stories
1 करोनामुळे पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या- सोनू सूदची मागणी
2 कॉमेडी क्वीन भारती सिंहला रडू कोसळलं, ” म्हणून आता आई होण्याची इच्छा नाही”
3 निधनाच्या अफवेनंतर मिनाक्षी शेषाद्री फोटो शेअर करत म्हणाल्या….
Just Now!
X