एका सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय कौशल्यामुळे तो चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. स्वत:च्या मेहनतीने ध्येय साध्य करणाऱ्या नवाजुद्दीनने संघर्षाच्या दिवसांत कोथिंबीर विकण्याचे कामदेखील केले होते. हा किस्सा त्याने स्वत: ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला.

नवाजुद्दीनने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नुकतीच हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या जीवनाशी निगडीत अनेक किस्से सांगितले. मीरा रोड येथे राहत असताना पैसे कमावण्यासाठी आपण कोथिंबीर विकल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे भाजी कसे विकतात हे माहित नसल्याने आपल्याकडचे सर्व पैसेसुद्धा गमवावे लागल्याचे नवाजुद्दीनने सांगितले. ‘माझ्या एका मित्राने २०० रुपयांची कोथिंबीर विकण्यासाठी आणली. कोथिंबीरची एक जुडी पाच रुपयांनी विकायला त्याने सुरूवात केली आणि थोड्या वेळाने ती कोथिंबीर काळी पडू लागली. त्यामुळे ती कोणी विकतही घेत नव्हते. आम्ही दोघे पुन्हा ज्याच्याकडून कोथिंबीर विकायला आणली तिकडे गेलो. तू दिलेली कोथिंबीर काळी पडू लागल्याने कोणीच विकत घेत नसल्याचे त्याला सांगितले. तेव्हा कोथिंबीरवर पाणी शिंपडत राहावे लागते नाहीतर ती काळी पडते असे त्याने आम्हाला समजावले. आमच्याकडे असलेल्या सर्व पैशांनी ती कोथिंबीर विकत घेतल्याने घरी जाताना आम्हाला विनातिकिट ट्रेनमधून प्रवास करावा लागला,’ असे नवाजुद्दीनने सांगितले.

नवाजुद्दीनचा आगामी ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत आहे.