अभिनेता रणवीर सिंग लवकरच ’83’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता त्यावर आधारित आहे. अभिनेता रणवीर सिंग या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तसेच या चित्रपटात भारताचा माजी मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, शेन वॉर्न, सर व्हिव्हियन रिचर्ड्स इत्यादी महत्वाचे क्रिकेटपटू दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान कपील देव यांनी त्यांचे कॉफी टेबल बुक ‘We The Sikhs’ रणवीरला भेट म्हणून दिले आहे. कपिल देव यांचा रणवीरला भेट देतानाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रणवीर आनंदी असल्याचे दिसत आहे.

‘83 ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क,चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ज्यांनी ८३ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिजला क्लीन बोल्ड केलेल्या बलविंदर सिंग यांची भूमिका एमी विर्क वठविणार आहे. क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील करणार आहे. त्याचप्रमाणे त्याकाळी इंडिया टीमचे उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकीब सलीम दिसणार आहे.

सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर भसीन व यशपाल शर्मा यांची भूमिका जतिन सरना वठविणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी करणार आहे. १९८३ मध्ये मान सिंग वर्ल्ड कप टीमचे मॅनेजर होते.