सोमवारी कॉमेडियन कपिल शर्मा व्हील चेअरवर बसून मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना दिसला. दरम्यान त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून तोंडावर मास्क लावला होता. कपिलचा व्हील चेअरवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल चिडून फोटोग्राफरला ‘उल्लू के पठ्ठे’ असे बोलताना दिसत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कपिल शर्माचा व्हिडीओ शेअर केला आहे. एका फोटोग्राफरने त्याला ‘कपिल सर कसे आहात? आम्ही व्हिडीओ शूट करत आहोत’ असे म्हटले होते. त्यावर कपिलने ‘तुम्ही सर्वजण आधी बाजूला व्हा’ असे म्हटले. त्यानंतर थोडं पुढे जाऊन त्याने ‘उल्लू के पठ्ठे’ असे म्हटले होते. त्यावर फोटोग्राफर कपिलला म्हणतो तुम्ही जे काही बोलत आहात ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाल्याचे सांगतो. ‘करा रेकॉर्ड… सर्वजण बेशिस्त आहात’ असे कपिल बोलताना दिसत होता.

कपिलचे अशा प्रकारचे वागणे पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. कपिल नेहमी फोटोग्राफर्सला भेटतो तेव्हा त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलताना दिसतो. पण काल अचानक कपिल फोटोग्राफरवर भडकताना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

कपिलला व्हील चेअरवर पाहून अनेकांनी लवकर बरा हो असे म्हटले आहे. पण कपिल व्हील चेअरवर का आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या संदर्भात स्पॉटबॉयला नुकतीच कपिल शर्माने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘माझी तब्बेत ठिक आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना पाठिला दुखापत झाली आहे. मी काही दिवसांमध्ये ठिक होईन’ असे उत्तर दिले.