निलेश अडसूळ
मराठी चित्रपट का चालत नाही, अमुक एक दिग्दर्शक-अमुक एक कलावंतच का सातत्याने पुढे येतात, नवी क्रियाशील पिढी कुठे आहे, विचारांची बैठक मजबूत करणारं चित्रपट हे माध्यम काही तुरळक हातांच्या स्वाधीन होतंय का, असे गंभीर प्रश्न माध्यमांना पडायला हवे. केवळ प्रश्नच नाही तर याचे उत्तर शोधण्याचाही आपण प्रयत्न करायला हवा. तो झाला तर चित्रपट सृष्टीतील खरे वास्तव जगासमोर येईल. असे म्हणत तरुण दिग्दर्शक सुजय डहाके याने चित्रपट सृष्टीतील वास्तवावर बोट ठेवले आहे. त्याच्या आगामी येणाऱ्या केसरी चित्रपटाच्या निमित्ताने लोकसत्ताशी संवाद साधताना त्याने हे विधान केले.
त्याच्या मते, कलाक्षेत्र केवळ प्रस्थापितांनीच व्यापले आहे का याचा विचार तुम्ही-आम्ही करायला हवा. एकीकडे अर्धनग्न अवस्थेतील प्रेमप्रसंग चित्रपटात सर्रास चालतात पण मराठीतील सध्या सोप्या शिव्याही यांना चालत नाही. कुणाचे चित्रपट पडायचे कुणाचे वर न्यायचे असे आडाखे इथे बांधले जातात. विशेष म्हणजे हे सगळ्यांना माहित असूनही केवळ दडपशाहीच्या भीतीने लोक गप्प बसतात. मग ही कंपूशाही नाही का, असा सवालही सुजय याने केला आहे. शिवाय ही कंपूशाही छेदून काढली नाही तर भविष्यात मराठी चित्रपटाचा अंत्यंत वाईट काळ सुरु झालेला असेल. असेही तो म्हणतो.
कुस्ती हा महाराष्ट्रातील जुना आणि तितकाच मनाचा क्रीडाप्रकार. २०१३ साली ही संहिता माझ्या हाती आली. तेव्हा दंगल, सुलतानाचे नावसुद्धा नव्हते. त्या दरम्यान या चित्रपटाचा प्रवास सुरु झाला. परंतु नंतर क्रीडाविश्वावर धडाधड आलेल्या चित्रपटांमुळे आम्हला थोडी विश्रांती घ्यावी लागली. विषय थोडा वेगळा असल्याने सुरवातीला निर्माता मिळणही कठीण होतं पण त्यानूच वाट काढत सिनेमा उभा केला. असे दिग्दर्शक सुजय डहाके चित्रपटाविषयी सांगतो.
सुजयच्या वैशिष्टय़ प्रमाणे याही चित्रपटात त्याने विराट मडके आणि रूपा बोरगावकर या नवीन कलाकारांना समोर आणले आहे. तर विक्रम गोखले, महेश मांजरेकर, मोहन जोशी, जयवंत वाडकर, छाया कदम, प्रवीण तरडे, उमेश जगताप अशा दिग्गज कलाकारांची खमंग फोडणी सोबतीला असल्याने कथा चांगलीच रंगली असेल यात शंका नाही. चित्रपटातील प्रमुख नायक विराट मडके सांगतो, एकांकिका, लघुचित्रपट या माध्यमातून आजवर काम करत आलो आहे. परंतु ही संधी माझ्यासाठी स्वप्नवत होती. इतक्या मोठय़ा कलाकारांसोबत काम करताना आपण खरंच पात्र आहोत का याचा मी अनेकदा विचार केला. पण हा चित्रपट करायचाच असा चंग बांधल्याने अभिनायची आणि कुस्तीची दोन्ही तालमी जोरदार सुरु झाल्या. पैलवानाला जे जे करणं आवश्यक आहे ते ते सर्व करून पैलवान झालो, आखाडय़ात जाऊन कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. पण हे करताना कुठेही अनैसर्गिक संसाधनांचा वापर केला नाही. असे तो सांगतो. तर त्याच्या मेहनती विषयी सुजय सांगतो, मला फक्त बॉडी वाढवलेला कलाकार नको होता, जो समजून उमजून पैलवान होईल असा माणूस हवा होता. तो याच्यात दिसला. त्याच्यासाठी त्याने घेतलेली मेहनत अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे विराट च्या निमित्ताने कोल्हापूरचा कलाकार अनेक वर्षांनी मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे.
आज कुस्तीकडे कुठेतरी दुर्लक्ष झाले आहे. एकेकाळी पैलवान होणं हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. परंतु आता तो काळ निघून गेला आहे. अनेक अंगाने कुस्ती बदलून गेली, राजकीय हस्तक्षेप वाढला, उद्देश बदलेले त्यामुळे कुस्तीवर प्रेम करणारा प्रेक्षकही कमी झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने लोक पुन्हा एकदा कुस्तीकडे वळतील, दृष्टिकोन बदलतील अशी अशा आहे. असे विराट सांगतो. तर या कुस्तीतील पैलवान हा खऱ्या पैलवाना सारखा घडवला गेला. एका पैलवानाला घडवण्यासाठी महिन्याचा पन्नास हजारांहून अधिक खर्च येतो. या खर्चात निर्मात्यांनीही सढळ हस्ते मदत केली त्यामुळे अशा विषयाला हात घालण्याची जोखीम उचलल्याने निर्मात्यांचे विशेष आभार मानायला हवे असे अभिनेते जयवंत वाडकर सांगतात. या चित्रपटात त्यांनी कुस्ती शिकवणाऱ्या वस्तादाची भूमिका केली आहे. पुढे वाडकर सांगतात, हिंदीमधून काहीतरी शिकण्याची प्रत्येकाला गरज आहे. आज निर्मितीत उतरलेल्या कॉर्पोरेट कंपन्यानी चित्रपटांची गणितं बदलवून टाकली आहेत. अवघ्या पंधरा आणि वीस दिवसात सिनेमे पूर्ण केले जातात. मग त्यामागे अभ्यासाची वानवा असली तरी त्यांना फरक पडत नाही. या प्रकारामुळे स्पर्धा वाढली पण कुठेतरी आपणच आपल्या सिनेमांचे पाय खेचू लागलो. ही शोकांतिका आहे. असेही ते सांगतात. तर यांच्याच विधानाला दुजोरा देत सुजय म्हणतो, मराठी चित्रपटांवर माध्यमांचं प्रेम निवडक आणि मर्यादित झालं आहे. कुणाला प्रसिद्धी द्यायची कुणाची वाहवा करायची याचीही आखणी हल्ली केली जाते. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेमच मिळत नाहीय. सैराट सोडला तर मराठीत एकही चित्रपट अजून हिट झालेला नाही. म्हणजे सैराट पासून चांगला आशयच आला नाही असं आहे की चांगला आशय येऊनही पुढे आणला जात नाही. असाही प्रश्न तो करतो.
अभिनेत्री छाया कदम या चित्रपटात पैलवानाच्या आईची भूमिका साकारत आहे. त्यांचाही आजवरचा प्रवास दखलघेण्याजोगा आहे. त्यांच्या मते, चित्रपट क्षेत्रात सातत्याने प्रस्थापित कलाकारांना समोर आणलं, त्यांचीच वाहवा केली तर नवोदित कलाकारांनी कुठे जायचं. आज मला उशिरा यश मिळालं याच दु:ख अजिबात नाही परंतु अनेक नवीन मुलं अभिनयाची उत्तम कसब असूनही मागे राहत आहेत याची खंत आहे. फॅन्ड्री नंतर मला अनेक फोन आले त्यातले अनेक चित्रपट फॅन्ड्री सारखेच होते मग अशा वेळी ते का करायचे असा प्रश्न असतो. पण काही संहिता मात्र प्रत्येक वेळी नवा विचार करायला लावतात. मग अशा भूमिका आल्या की, ती भूमिका केवढी आहे, कशी आहे याचा मी विचार करत नाही असे छाया सांगतात.
वयाच्या २३व्या वर्षी ‘शाळा’ सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शक सुजय डहाकेचा कुस्तीविश्वाचे वास्तव सांगणारा ‘केसरी’ हा मातीतला सिनेमा येत्या २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने अभिनेता विराट मडके, जयवंत वाडकर, अभिनेत्री रूपा बोरगावकर, छाया कदम, दिग्दर्शक संजय डहाके, निर्माते संतोष रामचंदानी यांनी लोकसत्ताला भेट दिली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या गप्पांसोबतच चित्रपटसृष्टीतील वास्तवावरही भाष्य केले.
रॅपचे प्रयोजन
रॅप हा प्रकार काळ्या लोकांनी आपला आक्रोश मांडण्यासाठी जन्माला घातला होता. आणि अशाच पद्धतीचा आक्रोश या कुस्तीत आहे. त्यामुळे या दोन घटकांच्या धागा जोडत या चित्रपटात रॅप संगीताचं प्रयोजन केलं आहे. विशेष म्हणजे शीव मध्ये राहणाऱ्या ‘युग‘ एका तरुण मुलाने हा रॅप केला आहे. एखाद्या प्रसंगाला अति भावनिक करण्यासाठी संगीताचा वापर केला जातो. पण एखाद्या ठिकाणी काही वेगळा प्रयोग करून पाहायला काही हरकत नसते तोच प्रयोग इथे केला आहे.