अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता कृष्णा अभिषेक याने देखील उडी घेतली आहे. “जर टॅलेंटऐवजी फक्त घराणेशाहीच्या जोरावरच काम मिळत असतं तर आज मी वरुण धवनच्या जागी उभा असतो”, असं प्रत्युत्तर त्याने टीकाकारांना दिलं आहे.
अवश्य पाहा – सुशांतनं पत्ता म्हणून दिलेला फ्लॅट आठ वर्षांपूर्वीच रियाच्या वडिलांनी घेतला होता विकत
कृष्णा अभिषेक प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं. “प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल हे करावंच लागतं. इतर कलाकारांप्रमाणे स्टार किड्सला देखील चित्रपट उद्योगात टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागते. तुम्हाला ओळखीवर सुरुवातीला एक दोन चित्रपट मिळतात पण ते जर फ्लॉप झाले तर कोणीही काम देत नाही. माझा मामा गोविंदा स्टार आहे म्हणून तो माझ्याजागी येऊन काम करणार नाही. माझं काम मलाच करावं लागतं. जर टॅलेंटऐवजी फक्त घराणेशाहीच्या जोरावरच काम मिळत असतं तर आज मी वरुण धवनच्या जागी उभा असतो. त्यामुळे घराणेशाहीवर चर्चा करण्यापेक्षा जे कलाकार खरंच चांगलं काम करतायत त्यांना प्रोत्साहन द्यावं.” बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत असं मत कृष्णाने व्यक्त केलं.
अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा
कृष्णा अभिषेक एक प्रसिद्ध अभिनेता आहे. २००२ साली ‘ये कैसी मोहब्बत’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘पूजा चरण मा बाप के’, ‘देवरजी’, ‘काहे बासुरिया बजाऐ’, ‘हमार इज्जत’ यांसारख्या काही भोजपुरी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. ‘कॉमेडी सर्कस’ या टीव्ही शोमुळे कृष्णाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘बोल बच्चन’, ‘एन्टरटेन्मेंट’, ‘क्या कूल है हम’ यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. सध्या कृष्णा एक लोकप्रिय विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो.