रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपा रिपब्लिक टीव्हीवर फ्रीमध्ये जाहिरात करुन घेतय” असा टोला त्याने लगावला आहे.

अवश्य पाहा – ‘किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं’; अर्णब गोस्वामींच्या अटकेवर दिग्दर्शक समाधानी

कुणाल कामरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो आपल्या अनोख्या विनोदी शैलीत भाष्य करतो. यावेळी त्याने अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “अर्णब गोस्वामी यांना अटक होताच त्यांचे समर्थक भाजपा आणि एबीवीपीचे झेंडे घेऊन रिपब्लिक वृत्तवाहिनीवर येऊ लागले. भाजपा रिपब्लिक टीव्हीवर स्वत:ची मोफत जाहिरात करुन घेत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कुणालने उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा?

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.