कौतुकोद्गार प्रत्येकालाच आवडतात, पण जर ते एखाद्या खूप मोठ्या व्यक्तींकडून ऐकायला मिळाले तर आयुष्य सार्थक लागल्याची भावना मनात येते. अशीच भावना अभिनेता सुबोध भावेच्या मनात आली आहे. कारण भारताच्या गानकोकिळेनं म्हणजेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुबोधच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. लतादीदींनी ‘बालगंधर्व’ या चित्रपटाविषयी एक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे लतादीदींची पोस्ट?

नमस्कार. आज मी पहिल्यांदा बालगंधर्व हा मराठी चित्रपट जो मराठी संगीत नाटकातील खूप महान कलाकार आणि तेवढेच प्रामाणिक व्यक्ती बालगंधर्वजी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बालगंधर्व यांना मी दोन-तीन वेळा भेटले, ते खूप प्रेमाने मला भेटायचे, आशीर्वाद द्यायचे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मी त्यांना शिवाजी पार्क येथे आमंत्रित केलं होतं, तेव्हा तेथे येऊन त्यांनी दोन भजनंसुद्धा गायली. हा चित्रपट पाहताना मला त्या सर्व गोष्टी आठवल्या. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या, त्या मला चित्रपटाच्या माध्यमातून समजल्या. हा चित्रपट खूप चांगला आहे आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारणारे सुबोध भावे आणि त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणारे आनंद भाटे आणि इतर सर्व कलाकारांचं मी अभिनंदन करते. त्याचसोबत एक फोटो ज्यामध्ये वसंत देसाई, मी, बालगंधर्वजी, बेगम अख्तरजी आणि मोगुबाई कुर्डीकरजी आहेत, तो इथे जोडते.

लतादीदींची ही पोस्ट शेअर करत सुबोध भावेनं आनंद व्यक्त केला. ‘साक्षात सरस्वतीदेवीकडून कौतुक, अजून काय हवं? आयुष्य सार्थकी लागलं, लतादीदी तुम्हाला साष्टांग नमस्कार’, अशा शब्दांत सुबोधने त्यांचे आभार मानले.

लोकमान्य-एक युगपुरुष, बालगंधर्व, कटय़ार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटांतील मुख्य व्यक्तिरेखा सुबोध भावे यांनी अभ्यासपूर्ण अभिनयाने अविस्मरणीय केल्या.