देशभरात व राज्यातही करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून महत्त्वाची पाऊलं उचलली जात आहेत. लॉकडाऊन हा यासाठीच घेतलेलं एक पाऊल आहे. करोना विषाणू आणखी पसरू नये यासाठी जनतेला घरीच बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ही सूचना काहींकडून गंभीरपणे पाळली जात नसल्याचं दिसत आहे. याबाबतीत ट्विट करत लता मंगेशकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. संपूर्ण जगात करोनाने हाहाकार माजवला आहे. आपले पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वारंवार लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. करोनाला थांबवण्यासाठी हाच सर्वांत प्रभावशाली उपाय आहे. तरीसुद्धा लोकांना ही गोष्ट का समजत नाही?’, असं लतादीदींनी ट्विटरमध्ये लिहिलंय. करोनाशी लढण्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे का, आपली काहीच जबाबदारी नाही का, असा सवालही त्यांनी विचारलाय.

पाहा व्हिडीओ : दिमाग हिल गया क्या? लॉकडाऊन असतानाही बाहेर फिरणाऱ्यांवर भडकला अक्षय कुमार

सेलिब्रिटींकडूनही वारंवार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अक्षय कुमारनेही व्हिडीओ पोस्ट करत लोकांना सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.