कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे या संवादाची संपूर्ण महाराष्ट्राला गेली तीन वर्षे सवय झाली आहे. गेले काही महिने हा आवाज थांबला होता. मात्र आता हा आवाज पुन्हा नव्या दमात घुमला आहे. डॉ. नीलेश साबळे आणि त्यांच्या थुकरटवाडीतील कलाकार मंडळींच्या या लोकप्रिय शोने कात टाकून जगभरारी घेत नवा कल्ला सुरू केला आहे. सध्या जगभर चाललेला त्यांचा मराठमोळा कल्लाही प्रेक्षकांना भलताच आवडतो आहे. त्यानिमित्ताने, शोचे दिग्दर्शक, लेखक डॉ. नीलेश साबळे यांच्याशी मारलेल्या खास गप्पा..

  • जगभर दौऱ्याची संकल्पना नेमकी कोणाची होती आणि त्यावर मेहनत घ्यायला कधीपासून सुरुवात केली?

महाराष्ट्र दौऱ्याच्या संकल्पनेवर जेव्हा वाहिनीसोबत बैठक सुरू होती त्याच वेळी झी मराठीचे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर यांनी ‘हा शो महाराष्ट्रानंतर जगभर फिरला पाहिजे’ अशी थोडक्यात आशा व्यक्त केली. तेव्हा केवळ मी माझ्या मनाशी महाराष्ट्र दौरा आधी यशस्वी करून दाखवू मग पुढचं पुढे बघू असं ठरवलं. यशस्वी महाराष्ट्र व त्यापाठोपाठचा भारत दौरा केल्यानंतर जेव्हा आमची पुन्हा बैठक बसली तेव्हा मात्र मयेकरांनी विश्व दौरा करण्यावर जोर दिला. त्याक्षणी मला आनंद आणि भीती अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या, कारण अनोळखी जागा, अनोळखा देश, बोलायला व समजायला कठीण असणारी भाषा या सगळ्या गोष्टींवर कशी मात करणार याची थोडीशी चिंता होती. परंतु एकमेकांच्या सहकार्याने, विचारविनिमयाने ही चिंता नाहीशी  झाली. साधारण सहा महिन्यांपूर्वीच या दौऱ्यावर मेहनत घ्यायला संपूर्ण टीमने सुरुवात केली. वीणा वर्ल्डच्या माध्यमामुळे सारं काही सोपं झालं.

  • गेले दोन आठवडे दुबई व लंडनची सफर प्रेक्षकांना शोच्या माध्यमातून घडते आहे. या दौऱ्यातून प्रेक्षकांना नेमकं काय दाखवणार?

महाराष्ट्र व भारत दौऱ्याच्या वेळी त्या त्या शहरातील वास्तू, प्रेक्षणीय स्थळं प्रेक्षकांना ठाऊक होती. ती त्यांनी नक्कीच स्वत: अनुभवली असतील. त्यामुळे थोडक्यात आटोपशीरपणा तिथे चालू शकतो, परंतु लंडन – अमेरिका सगळेच अनुभवू शकत नाहीत. म्हणून हा जगभर दौरा ट्रॅव्हल शो न होता, तिथली शहरं, त्यामध्ये असलेली स्वच्छता, तिथली माणसं, त्यांची संस्कृती आम्ही सर्वसामान्य प्रेक्षकांनादेखील शोमधून दाखवणार आहोत, हे मी इथे स्पष्ट करतो. दुबई, अबुधाबीपाठोपाठ  लंडन,  पॅरिस, जपान, सिंगापूर, बाली, मॉरिशस,  दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका  अशा जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांत झी मराठीवर सध्या सुरू असलेल्या मालिकेतील कलाकारांना घेऊ न धुमाकूळ घालणार आहोत.  आणि विदेशातील मोठय़ा संख्येने उपस्थित असलेली मराठी माणसं व त्यांच्यातली एकी इथल्या लोकांना दाखवून अचंबित करणार आहोत.

  • यापूर्वीच्या चला हवा येऊ द्यामध्ये पाहुण्या कलाकारावर विनोद करून हास्यनिर्मिती करणं सोपं होतं, पण विदेशातील प्रेक्षकांना हसवण्यासाठी तुझ्यातील लेखक-दिग्दर्शक कशी तयारी करतो?

सहा महिने आधीपासूनच मी थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली होती. समाजमाध्यमांवरून, इंटरनेटवरून त्या त्या शहरांची माहिती मी मिळवू लागलो. त्या त्या शहरातील बोलीभाषेतील सोपे सोपे जे प्रेक्षकांना कळतील व विनोदी असतील असे शब्द शोधू लागलो. कारण त्या त्या शहरानुसार प्रत्येक शोचं स्क्रिप्ट तयार होणार आहे. त्या स्किटमध्ये त्या त्या कलाकाराला तेथील पेहराव, बोलण्याची पद्धत अवलंबावी लागणार आहे. विनोदी लेखनात एक पाऊल पुढे टाकताना प्रेक्षकांचा विचार करून लिखाण करू लागलो. मिरारोड येथे शूटिंग करताना १३० जण आम्ही एकत्र काम करत होतो. परंतु परदेश दौऱ्यावर मात्र ३५ जणच आहोत. त्यामुळे मोठय़ा वस्तूंबरोबरच पेहराव, मिशी, काठी, मोठमोठय़ा छत्र्या या बारीकसारीक गोष्टी सोबत घेतल्या का?,  इथपासून कसून चौकशी मुलांजवळ करावी लागते. इथूनच पन्नास पानांची स्क्रिप्ट लिहून तिथे सादर करावी लागते. स्किटमध्ये आयत्या वेळी कोणतेही बॉम्ब फोडून चालत नाहीत. नाहीतर सावळा गोंधळ अटळ आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्या वेळेत त्या देशातील पर्यटन स्थळी शूटिंग करणार आहोत त्या देशातील हवामान त्या वेळी शूटिंगला पोषक आहे का? नसेल तर काय उपाययोजना करायची? या गोष्टींचा विचार इथेच करावा लागतो आणि त्याप्रमाणे तयारी करावी लागते. अशा प्रकारे मला त्या त्या देशातील संस्कृतीपासून हवामानापर्यंत सगळा अभ्यास करावा लागतो.

  • शूटिंगच्या दरम्यान तिथल्या लोकांनी तुम्हाला साहाय्य केलं का?

एका मराठी माणसाच्या पाठीशी दुसरा मराठी माणूस खंबीरपणे उभा असतो, परंतु विदेशात अनोळख्या शहरात एका मराठी माणसाच्या पाठीशी त्याच्या बिकट प्रसंगात परदेशी मनुष्य उभा असतो, याची प्रचीती मला पॅरिसमध्ये शूटिंग करत असताना आली. १५० एकरच्या आवारात वसलेल्या राजवाडय़ात सुरळीत शूटिंग सुरू होतं. दोन तासांच्या मुदतीत शूटिंग पूर्ण करण्याची तंबी मला देण्यात आली होती. पर्यटकांची गर्दी सांभाळत, शूटिंग सुरू होतं. राजवाडय़ातील लोकांनासुद्धा इथे काहीतरी वेगळं, फनी शूटिंग सुरू असल्याची कल्पना आली. कलाकारांवर व त्यांच्या आविर्भावावर राजवाडय़ातले लोक फिदा झाले. अचानक राजवाडय़ात एके ठिकाणी काम चालू असलेल्या कामाच्या मशिनरीजचा आवाज येऊ  लागला. कृपया २ तास शूटिंग पूर्ण होईपर्यंत मशीन बंद ठेवा, अशी वीणा वर्ल्डच्या साथीने मी तेथील लोकांना गळ घातली. त्यांनी लगेच कोणतीही अर्वाच्य भाषा न वापरता मशिनरीज ताबडतोब बंद केल्या आणि कर्मचारीदेखील शूटिंग बघू लागले. राजवाडय़ातील रिकाम्या खोल्या, रिकाम्या जागा शूटिंगसाठी खुल्या करून दिल्या.

  • कुशल बद्रिके व सागर कारंडे दोघेही कलाकार आउटडोर शूटिंगमध्ये स्त्री अवतारातच दिसत आहेत..

लोक गांगरून जायचे त्यांना बघून. जसे लोकांना समोर कॅ मेरे दिसायचे. इथे कसलं तरी शूटिंग सुरू आहे याची कल्पना यायची तेव्हा कुठेतरी ते शांत व्हायचे. सीन संपल्यावर हळूच येऊ न त्यांना विचारायचे तुम्ही पुरुष आहात का?  जसं त्यांना स्पष्ट व्हायचं की हे पुरुष आहेत तेव्हा ते सर्वप्रथम त्यांचं तोंडभरून कौतुक करायचे. शोबद्दल विचारपूस करायचे. लगेच त्यांच्यासमोरच गुगल करून शोची अधिक माहिती मिळवायचे. रस्त्यावरून जा-ये करणारे विदेशी पथिक आपापल्या मोबाईलमध्ये आमचे सीन शूट करायचे. सीन संपल्यावर कट म्हटल्यावर टाळ्या वाजवायचे. त्याक्षणी खूप भरून यायचं. त्यांच्यातही चला हवा येऊ  द्याची हवा निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. सागर आणि कुशलचं विशेष कौतुक तर आहेच, कारण सकाळी ८ वाजता हॉटेलवर नेसलेली साडी रात्री १० वाजता सोडायची हा चेष्टेचा भाग नाही. ४८ डिग्री तापमानात जिथे मेकअप दर २० मिनिटांनी फिका पडतोय. विग गळून पडतेय. व्हॅनिटी व्हॅन नाहीत अशा परिस्थितीत जड व अंगवळणी नसलेले कपडे घालून भूमिका साकारणं कठीण असतं. ते त्यांनी करून दाखवलं.

  • विश्व दौऱ्याच्या निमित्ताने तू नवीन शीर्षकगीत प्रेक्षकांसमोर आणलं आहेस. त्याविषयी काय सांगशील?

केवळ दोन तासांत मी शीर्षकगीत लिहून पूर्ण केलेलं आहे. माझ्या सख्ख्या भावाने विवेक साबळेने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. त्या गाण्यात सगळ्या देशांच्या नावाबरोबरच मला मराठी बाणा अपेक्षित होता. जो अचूक साधला गेला आहे. केवळ त्या देशाला भेट देऊन शूटिंग करून परत न येता, त्या देशाला मराठीचं वेड लावायचं माझ्या या शोच्या रूपाने स्वप्न आहे. जे मी या शीर्षकगीताच्या शेवटच्या ओळीत नमूद केलं आहे. माझ्या आयुष्यातलं हे माझं पहिलंवहिलं मी शब्दबद्ध केलेलं टायटल साँग आहे. ‘जिथे मराठी तिथे झी मराठी’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करत असलेल्या झी मराठीने या विश्व दौऱ्याच्या निमित्ताने मनोरंजनाच्या नकाशावर एक धाडसी पाऊल टाकलं आहे, यात शंका नाही.