पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनावरील स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी १५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
‘निवडणुकीच्या काळात प्रत्येक पक्षाला समान संधी मिळावी यासाठी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे प्रदर्शन होऊ नये. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास भाजपाला त्याचा फायदा होऊ शकतो,’ असं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं होतं.
Makers of biopic 'PM Narendra Modi' move the Supreme Court against the stalling of the film's release. Supreme Court agrees to hear the case on April 15. pic.twitter.com/QWh6CnPOlb
— ANI (@ANI) April 12, 2019
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता निवडणूक काळापर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे.