अभिनेत्री कंगना रणौत हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आनंदाची बाब म्हणजे फक्त भारतच नाही तर जगभरातील तब्बल ५० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
येत्या २५ जानेवारीला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जगभरातील ५० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे. कंगना व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यासारखे मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
#Manikarnika: The Queen Of Jhansi to release in over 50 countries worldwide in #Hindi, #Tamil and #Telugu… 25 Jan 2019 release. pic.twitter.com/9xNhUHZ4Yz
— taran adarsh (@taran_adarsh) January 23, 2019
या चित्रपटाच्या निमित्तानं कंगना दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादात सापडला आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेनं या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे असा करणी सेनेचा आरोप आहे. मात्र करणी सेनेच्या आरोपांना भीक न घालता ‘जर माझ्या मार्गात याल तर एकालाही सोडणार नाही’ असा धमकीवजा इशारा कंगनानं दिला आहे.