जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पुण्यातील तळजाई टेकडी वर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन ‘वृक्षारोपण करून’ पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली आहे.
महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळावर तोडगा म्हणून, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, अभिनेता योगेश सुपेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य बाबा पाटील, डॉ. शंतनू जगदाळे आणि माध्यम तज्ञ विनोद सातव ह्यांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. त्यांनी सिने कलाकारांना, प्रसार माध्यमांना आणि सुज्ञ पुणेकरांना वृक्षारोपणासाठीआवाहन केले होते  आणि त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला ! पुण्यातील साहित्य,कला,  खेळ आणि राजकारण इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि इतर सुज्ञ पुणेकरांनी देखील ह्या कार्यक्रमाला आवर्जून वर्णी लावली होती.
vruksh
माननीय महापौर प्रशांत जगताप, उप महापौर मुकारी अलगुडे, स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप, तसेच मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत कुलकर्णी,  ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार आणि लेखक किरण यज्ञोपवीत, कवी-अभिनेता संदीप खरे, कवी वैभव जोशी  शिवाय प्रवीण तरडे, विनोद खेडकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता माळी, अश्विनी एकबोटे, देवेंद्र गायकवाड, रोहन मंकणी, शिवराज वाळवेकर,श्रीराम पेंडसे, आशितोष वाडेकर, चेतन चावडा हे कलाकार आणि संगीतकार विश्वजीत जोशी,दिग्दर्शक डॉ अंबरीश दरक, नितीन चव्हाण, अजय नाईक,  बंटी-प्रशांत, अड. रमेश परदेशी इत्यादी व्यक्तींनी वड, कडूनिंब, पिंपळ ह्यांसारखे मोठे वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार केली आहे.
झाडं लावल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी असते ती झाडं जगवण्याची ! हि जबाबदारी घेतली आहे पुणे महानगर पालिकेच्या,  वृक्ष संवर्धन समितीने ! माननीय महापौर श्री प्रशांत जगताप आणि नगरसेवक श्री सुभाष जगताप ह्यांनी ह्या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि पुणे महानगर पालिका ह्या झाडांची निगराणी आणि जोपासना करेल हे आश्वासनही दिले आहे. त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळे असे उपक्रम पुण्यात वारंवार घडतील आणि पुणे लवकरच हिरवेगार होईल .