बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी चौकशी सुरु असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करत असलेल्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील काही बड्या कलाकारांची नावे समोर आली. तसेच एनसीबी या कलाकारांची चौकशी करत आहे. पण चौकशी सुरु असताना मिनिटा-मिनिटाला समोर येणाऱ्या माहितीवरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शंका व्यक्त केली आहे.

आज एनसीबीकडून दीपिका पदूकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती प्रसारमाध्यमांकडून दाखवली जात आहे. दाखवल्या जाणाऱ्या माहितीबाबत सचिन सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

”एनसीबी कार्यालयात काय घडतंय याची मिनिटा-मिनिटाची माहिती माध्यमांवर सांगितली जात आहे. एनसीबीकडून या सर्व गोष्टींचे खंडण व्हायला हवे. जर असे झाले नाहीतर असे समजले जाईल की, एनसीबीकडून मुद्दाम माहिती दिली जात आहे. हे खंर असेल तर अत्यंत वाईट आहे” या आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी सुरु आहे. तसेच काल शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली.