‘रोबोट’च्या दुसऱ्या भागाचे थ्रीडी स्वरूपात चित्रीकरण

सुपरहिरोपट, साय-फाय चित्रपट बनवणे हे आपल्याकडे अजूनही आर्थिकदृष्टय़ा आव्हान आहे. ‘रा. वन’ केल्यानंतर स्वत:ची व्हीएफएक्स कंपनी असूनही शाहरूख खानने अजूनपर्यंत तसा चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. या पाश्र्वभूमीवर सातत्याने मोठय़ा प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्राचा वापर करून चित्रपट देणाऱ्या दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २०१० साली आलेल्या ‘रोबोट’ या रजनीपटाच्या सिक्वलसाठी तब्बल साडेतीनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पूर्णत: थ्रीडी स्वरूपात याचे चित्रिकरण करण्यात येणार आहे.

[jwplayer izOWW4O7]

‘रोबोट २.०’ या सिक्वलचा फर्स्ट लुक खुद्द रजनीकांत यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. हिंदी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार या सिक्वलपटात पहिल्यांदाच खलनायक म्हणून रजनीकांत यांच्यासमोर उभा ठाकणार आहे. सिक्वलपटासाठी साडेतीनशे कोटी रुपये खर्च येणार असला तरी रजनीकांत यांच्या चित्रपटांना मिळणारे यश पाहता चित्रपटाचे निर्माते हेही शिवधनुष्य पेलायला तयार आहेत, अशी ग्वाही निर्मात्यांनीच दिली. या चित्रपटात हॉलीवुडपटांच्या दर्जाचे व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्यानेच खर्चाचा आकडा मोठा असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट के ले. ‘रोबोट’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाने तिकीटबारीवर कमाईचे विक्रम मोडले होते. त्यानंतर आलेल्या ‘कोचडियान’ला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण ‘रोबोट २.०’बद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सूकता आहे.

आगंतुक सलमान

सलमान खालच्या करामती चाहत्यांना नवीन नाहीत मात्र तरीही ‘रोबोट २.०’च्या फर्स्ट लुक अनावरण सोहळ्यात कोणाच्याही निमंत्रणाविना सलमान खान यशराज स्टुडिओत दाखल झाला. रजनीकांत यांचा चाहता असल्यानेच त्यांना तिथे भेटण्याचा मोह आवरला नाही, अशी कबूली सलमानने दिली. ‘जुम्मा चुम्मा’ हे गाणे स्टेजवर सादर करत असताना आपली रजनीसरांशी भेट झाली होती. त्यावेळी स्टेजच्या मागे रजनीकांत सिगारेट हवेत उडवून तोंडात पकडण्याची त्यांची खाशी शैली आजमावून बघत होते. त्यांनी अखेर सिगारेट तोंडात पकडली की नाही, याची उत्सूकता आपल्यालाही शांत बसू देत नव्हती, हा त्यांच्याबद्दलचा अनुभव सांगत सलमानने रजनीकांत यांची भेट घेतली.

[jwplayer OnydZc5l]