जेव्हा एखाद्या कथानकात खच्चून नाटय़ भरून राहिलेले असते तेव्हा त्या कथेत टिपिकल बॉलीवुडी कथेप्रमाणे पाणी घालायची गरज भासत नाही. अशा वेळी ते नाटय़ प्रभावीपणे दर्शकांपर्यंत कसे पोहोचेल हेच दिग्दर्शकाचे महत्त्वाचे काम असते. ते जेव्हा जमते तेव्हा मग तुम्ही त्या कथेत गुंतून जाता. ती पाहताना उगाच बालिश प्रश्न मनातदेखील येत नाहीत. नेटफ्लिक्सवरील नार्कोज ही वेबसिरीज याच वर्गात मोडणारी आहे. कोलंबियातील अमली पदार्थाच्या माफियांवरील ही वेबसिरीज ऑगस्ट २०१५ पासून सुरू झाली असून प्रचंड लोकप्रिय आहे. सप्टेंबर  २०१७ मध्ये या सिरीजचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला आहे आणि चौथ्या सीझनचे चित्रीकरण सुरू असल्याच्या बातम्या आहेत.

कोलंबियातील अमली पदार्थाच्या व्यवसायाचा अनभिषक्त सम्राट पाब्लो एस्काबोरच्या मृत्यूनंतर तेथील अमली पदार्थाची बाजारपेठ मोडकळीस येण्याऐवजी त्याच्या मृत्यूवर टपून बसलेल्या कॅली कार्टेल या दुसऱ्या एका अमली पदार्थाच्या बाजारात सक्रिय असणाऱ्या संघटनेच्या खिशात अलगद पडते. किंबहुना कॅली कार्टेलदेखील पाब्लोला मारण्याच्या प्रयत्नात असते. नार्कोजचे पहिले दोन्ही सीझन हे केवळ पाब्लो एस्काबोरसाठीच आहेत. आणि तसेही ते जुने झाले आहेत. त्यामुळे सध्या केवळ तिसऱ्या सीझनवर बोलूया. दुसऱ्या सीझनच्या अखेरीस पाब्लो पोलिसांशी झालेल्या चकमकीत मरतो आणि तिसऱ्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडची सुरुवात कॅली कार्टेलच्या एका चमत्कारिक मात्र धूर्त आणि धोरणी अशा घोषणेने होते. कोलंबियन पोलीस, अमेरिकेची अमली पदार्थविरोधी यंत्रणा ही आजवर पाब्लोच्या मागे हात धुऊन लागलेली असते, परिणामी मधल्या काळात कॅली कार्टेलने बरेच हातपाय पसरलेले असतात. दिवसाला तीस टन इतके कोकेन ते अमेरिकेत चोरटय़ा मार्गाने पाठवत असतात. आणि पाब्लोच्या मृत्यूनंतर काही काळातच कॅली कार्टेलचा प्रमुख गिलबटरे रॉड्रिग्ज पुढील सहा महिन्यांत प्रत्यार्पणाची घोषणा करतो. सहा महिन्यांत जमेल तेवढा पैसा कमवा, प्रत्यार्पणानंतर पैसा सुरक्षित राहील आणि शिक्षापण कमी असेल असे त्याचे धोरण असते. कोलंबियातील बदललेल्या सरकारशी त्याने केलेल्या सौदेबाजीमुळेच तो हे धाडस करत असतो. पण हे प्रत्यार्पण त्याच्या कार्टेलमधील सर्व सहकाऱ्यांना सारखेच पटलेले नसते. एकीकडे कोलंबियन सरकारचा कॅलीच्या प्रत्यार्पणाला आतून पाठिंबा असतो, तर दुसरीकडे अमेरिकेच्या पाताळयंत्री गुप्तचर संघटनेलादेखील तेच हवे असते. तिसरीकडे पाब्लोच्या मोहिमेत सामील झालेला अमेरिकी डिइए एजंट पेना हादेखील पुन्हा कोलंबियात येतो. खरे तर उजव्या नक्षली गटांना पाब्लोची माहिती पुरवली आणि हे उजवे नक्षली गट कॅलीचा पाठिंबा घेत असल्यामुळे एजंट पेनाला अमेरिकेत परत बोलावून घेतलेले असते. पण कॅली कार्टेलची जबाबदारी त्याच्यावर टाकून त्याला पुन्हा कोलंबियाला पाठवले जाते. एजंट पेनाला त्याच्यावरील जुना ठप्पा पुसायचा असतो, तर कॅली कार्टेलमधील सर्वानाच प्रत्यार्पण मंजूर नसते, त्यातून एकमेकांना शह देण्याच्या खेळी सुरू होतात. त्यातच काली कार्टेलचा मुख्य सुरक्षा अधिकारी डिइएच्या गळाला लागतो. गिलबटरेला अटक होते आणि कार्टेलच्या उरलेल्या तीन सूत्रधारांची धावपळ सुरू होते. प्रत्यार्पण बाजूला राहते आणि घमासान नार्को गँगवॉरची सुरुवात होते.

हे गँगवॉर जितके घमासान तितकेच वेगवानदेखील आहे. प्रत्यक्षातील प्रसंग केवळ तीन-चार महिन्यांच्या कालावधीचेच आहेत. पहिल्या दोन्ही सीझनमध्ये पाब्लो एस्काबोरच्या आयुष्यातील अनेक टप्पे उलगडत जाणारी, कधी कधी संथ वाटणारी ही सिरीज तिसऱ्या सीझनमध्ये मात्र सतत कोणाच्या ना कोणाच्या पाठलागावर राहते. पण या सर्व हालचाली आधीच्या काळापेक्षा स्मार्ट असतात. कारण या माफियांनी सुरू केलेला तंत्रज्ञानाचा वापर. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर सरकारी यंत्रणा करणार नाहीत इतक्या वेगाने गुन्हेगारीजगत वापरत असते याचे अगदी ठाम प्रत्यंतर यात दिसून येते.

हे सर्व अत्यंत प्रभावीपणे मांडण्याचे काम दिग्दर्शकाचे. यापूर्वीच्या सीझनमध्ये आपल्याला कॅली कार्टेलच्या व्याप्तीबद्दल फार त्रोटक कल्पना आलेली असते. पण हे नार्को वॉर टिपताना दिग्दर्शक या माफियांच्या एक एक गोष्टी मांडत कॅली कार्टेलची व्याप्तीदेखील समोर आणतो. त्याचबरोबर सरकारातील हालचाली, सीआयएची लुडबुड हे सारे खुबीने उलगडत जाते. मोबाइल, फोन टॅपिंग, छुपे कॅमेरे, बँकिंगमधल्या क्लृप्त्या असे कालानुरूप झालेले अनेक बदल आत्मसात करत कॅली कार्टेल फोफावलेले असते आणि त्यातून त्यांची पोहोच काय आहे याचे पुरेसे चित्र यात उभे राहते. पण हे केवळ माफियाबद्दलच नाही तर समांतरपणे त्याच्याशी निगडित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांमध्येदेखील कसे तंटे निर्माण करते हे दिसून येते.

खच्चून नाटय़मय कथा असली तरी त्याची मांडणी करण्याचे कौशल्य नसेल तर सारेच गडबडू शकते. या संपूर्ण सीझनमध्ये एकाच वेळी अनेक घटना घडत असतात. प्रत्येक घटना महत्त्वाची असते. अशा वेळी त्याची गुंफण व्यवस्थित करायची असेल तर तितक्याच ताकदीचा पटकथाकार आणि संकलकदेखील गरजेचा असतो. या दोघांनीही ती बाजू अत्यंत कौशल्याने सांभाळली आहे. नार्कोज ही काही प्रमाणात पिरिअड कलाकृती म्हणावी लागेल. त्यामुळे अनेक बाबींचा वापर टाळावा लागतो, तर सत्य घटनेवर आधारित असताना काही घटनांमध्ये उगीचच तोडमोड करता येत नाही. हे सारे भान जपत त्या काळाचा पट उलगडून दाखवणे आणि तोदेखील रंजकपणे हे महत्त्वाचे आहे. ते नार्कोजच्या प्रत्येक भागात दिसून येते. पात्रनिवड हा तर संपूर्ण नार्को सिरीजचा आत्मा आहे आणि तो जिवंत राखण्याचे काम चोखपणे झाले आहे.

हिंसा कितीही वाईट असली तरी हिंसाधारित चित्रपट, सिरीज लोकप्रिय होत असतात. पण केवळ या विषयावरच ती लोकप्रियता गाठता येत नाही. त्यासाठी प्रत्येक घटकांवर मेहनत गरजेची असते. ती मेहनत नार्कोजमध्ये अगदी पुरेपूर घेतली गेली आहे. पन्नास-पंचावन्न मिनिटांचे दहा भाग असणारा हा सीझन अगदी वेळ काढून पाहू शकता आणि नार्कोजची बाजारपेठ काही अशा एखाददुसऱ्या कार्टेलनंतर थांबणारी नाही, त्यामुळे पुढच्या सीझनच्या प्रतीक्षेत राहायलादेखील हरकत नाही.