|| रेश्मा राईकवार

गेल्या वर्षी अचानक देशव्यापी टाळेबंदी जाहीर झाली आणि चित्रीकरण ठप्प झाले. कित्येकांचे रोजगार बुडाले, वाहिन्या आणि निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत मनोरंजन क्षेत्रातील धुरीणांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कडक निर्बंधांमध्ये पुन्हा चित्रीकरण सुरू केले. ‘रामायण’, ‘महाभारत’सारख्या मालिकांचे स्मृतिरंजन करून झाल्यानंतरही कंटाळलेल्या प्रेक्षकांना आपल्या नेहमीच्या मालिका परतल्या म्हणून दिलासा मिळाला. या सगळ्यात फार काळ गेला आहे असे नाही… त्या तीन महिन्यांमध्ये झालेले आर्थिक नुकसान अजून भरूनही निघाले नसेल तेवढ्यातच पुन्हा टाळेबंदी अनुभवणाऱ्या राज्यात मालिकांचे चित्रीकरण परत एकदा बंद झाले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या अनुभवावरून शहाण्या झालेल्या वाहिन्या आणि मालिकांचे निर्माते यांनी या वेळी काम न थांबवता चित्रीकरणासाठी नव्या जागा शोधल्या. सध्या हिंदी-मराठीतील सगळ्याच मालिकांचे चित्रीकरण गोवा, हैदराबाद, सिल्वासा, दमण, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये सुरू आहे. तात्पुरत्या काळासाठी असला तरी हा बदल निर्माते, वाहिनी यांच्याबरोबरच मालिके तील कलाकार-तंत्रज्ञ प्रत्येकासाठीच नवीन आहे. नव्या राज्यात, नव्या वातावरणात आपल्या घरच्यांना सोडून ही मंडळी आपल्या कामात रमण्याचा प्रयत्न करत आहेत. सेट बदलला आहे, आजूबाजूचे वातावरण नवे आहे, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क न ठेवता आपल्या टीमबरोबर काम करणारी ही मंडळी एका नव्या उत्साहाने कामाला लागली आहेत खरी… पण गोष्टी नेहमीइतक्या सोप्या राहिलेल्या नाहीत, अशी भावना दिग्दर्शक, जुन्याजाणत्यांपासून नव्या कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच व्यक्त के ली आहे.

‘अजूनही चाचपडतो आहोत’

आम्ही आता सगळेच गोव्यात आलो आहोत चित्रीकरणासाठी… इथे आम्ही बायो बबल पद्धतीने चित्रीकरण करतो आहोत. खरं तर मुंबईतही अशा पद्धतीने चित्रीकरण करणं शक्य होतं. आम्ही सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे चित्रीकरण करत होतो. दर शुक्रवारी आमची आरटीपीसीआर, प्रतिजन चाचण्या करून घेत होतो. मला वाटतं करोनाचा संसर्ग वाढत असल्याने बंदी घालायचीच होती तर ती सगळ्यावरच घालायला हवी होती. देशभरात क्रिके टचे सामनेही बंद करायला हवे होते, मात्र तसं झालेलं नाही. तिथेही मैदानात खेळाडू एकत्रच खेळतात, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरतात. मग फक्त मालिकांवरच बंदी कशाला? आता काही पर्यायच नसल्याने आम्ही सगळे इथे आलो आहोत. सेट नवीन आहेत, वातावरणही नवीन आहे. सध्या सगळेच चाचपडतो आहोत. घरच्यांना सोडून इथे पुन्हा त्याच निर्बंधात आणि बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून काम करणं ही एक प्रकारे तणावाचीच परिस्थिती आहे. – निवेदिता जोशी सराफ

‘आहे मनोहर तरी…’

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिके चं मी गोव्यात चित्रीकरण करते आहे. आमचा जो सेट आहे तो गोव्यात फार लांब आणि वर्दळ नसलेल्या अशा ठिकाणी आहे. आजूबाजूला गोव्याचा सुंदर असा निसर्ग आहे, समुद्रकिनारा आहे. वातावरण शांत आहे. सगळं कसं छान आहे, पण तरी काही कळेनासं झालं आहे. इथेही बायो बबल पद्धतीने बाहेरच्या कोणाशीही संपर्क येणार नाही, अशा पद्धतीने आम्ही चित्रीकरण करतो आहोत. ना कु ठलं दु:ख ना कुठला आनंद अशा विचित्र वातावरणात काम करतो आहोत. इतकी वर्षं मी काम के लं आहे, पण मनोरंजन करताना इतकं  दहशतीचं वातावरण मी पहिल्यांदा अनुभवलं आहे. माझ्या एका मालिकेचं चित्रीकरण इथे गोव्यात सुरू आहे, तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिके चं चित्रीकरण तिथे गुजरातच्या सीमेवर सुरू आहे. सुरुवातीला या दोन्ही मालिकांचं चित्रीकरण जवळपासच होईल असं वाटलं होतं; पण प्रत्यक्षात आता जे आहे त्या पद्धतीने काम करायचं. आता जी काही करोना संसर्गाची लाट आली आहे ती महिन्याभरानंतर थोडी ओसरेल. मग पुन्हा सगळे मोकळे होतील आणि आणखी उत्साहाने कामाला लागतील, असं वाटतं आहे. – शुभांगी गोखले

‘पुन्हा शून्यातून सुरुवात’

मुंबईत सगळाच सेटअप ठरलेला असतो. तो पुन्हा नव्या जागी तसाच्या तसा उभा करणं हे एक वेगळंच आव्हान आहे. बरं फक्त सेट नवीन उभारायचा नाही आहे, जागा नवीन असल्याने कथेतही काही बदल करणं ओघाने आलंच. कथेतला बदल प्रेक्षकांना तितका रंजकही वाटायला हवा. एक प्रकारे पुन्हा शून्यातून सगळं उभं करायचं आहे. आमच्यासाठी या सगळ्या परिस्थितीत आमचे निर्माते राजन शाही यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी इतक्या वर्षांत त्यांच्या कलाकारांनाच नाही तर लाइटमन, सेटवर काम करणारे तंत्रज्ञ, छोटे-मोठे कर्मचारी सगळ्यांना एकत्र जोडून ठेवलं आहे. त्यामुळे इथे सिल्वासात येऊन चित्रीकरण करायचं ठरलं तेव्हा सेटअप उभारणं आम्हाला तुलनेने खूप सोपं गेलं. आम्ही इथे पोहोचायच्या आधीच सगळी तयारी पूर्ण झाली होती. टाळेबंदीत उपाशीपोटी राहण्यापेक्षा हाताला काम आहे, हा विचार सगळ्यांनाच उत्साह देणारा असल्याने सगळे ईर्षेने काम करत आहेत. सध्या आम्हाला जी जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध झाली आहे, त्याचा गोष्टीत कसा वापर करून घेता येईल, याचा विचार करत गोष्टीला वळण देण्याचाही आम्ही प्रयत्न करतो आहोत. हा बदल प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. – रवी करमरकर,  दिग्दर्शक – आई कुठे काय करते

‘चित्रीकरणाचा नव्याने आनंद ’

सगळ्यांच्याच मनात सुरुवातीला चित्रीकरण बंद होणार याची भीती होती. पण आता इथे दमणला पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करतो आहोत याचा आनंद जास्त आहे. काळजीचं वातावरण आहेच, कारण इथेही नियम पाळावे लागत आहेत. सगळ्यांनी आपापल्या चाचण्या के ल्या आहेत आणि मग त्याचे अहवाल आल्यानंतर आम्ही इथे चित्रीकरणासाठी पोहोचलो. घरच्यांपासून दूर आहोत, त्यांचीही काळजी सगळ्यांना वाटते आहे; पण एक तर मुंबईत चित्रीकरण पूर्ण झाल्यावर घरी जायला मिळतं आहे याचा आनंदही असायचा आणि प्रवास करताना मनावर ताणही असायचा. आपल्यामुळे घरच्यांना काही त्रास होणार नाही ना, हा एक विचार असायचा. इथे आम्ही सगळे एकाच ठिकाणी राहतो आहोत. त्यामुळे एक मोठं कुटुंब असल्यासारखं आम्ही सगळे जण वावरतो आहोत. चित्रीकरण करताना इथे जबाबदारी जास्त आहे. नवीन जागा, नवीन नियम या सगळ्या गोष्टी असल्या तरी एकत्र काम करत असल्यामुळे ताण कमी होतो. एका नव्या ऊर्जेने आम्ही चित्रीकरणाचा आनंद घेतो आहोत. – अन्विता फलटणकर,  अभिनेत्री – येऊ कशी तशी मी नांदायला

‘आपापली काळजी घेऊन काम’

खरं सांगायचं तर सगळ्यांची सुरक्षितता हेच मोठं आव्हान आहे. एक युनिट इथे दमणमध्ये घेऊन आलो आहोत, त्यामुळे त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. आमच्या मालिके त दोन वेगवेगळे सेट आहेत, ते इथे नव्याने उभारणं हेही अवघडच काम होतं; पण सध्या सेट कु ठे आहे आणि क शा पद्धतीचा आहे, यापेक्षा आहे त्या सेटचा वापर करून आम्ही दृश्य किती रंजकतेने साकारतो आहोत हे महत्त्वाचं असेल असं मला वाटतं. प्रेक्षकांनाही जागेपेक्षा मालिके तून आशय काय समोर येतो आहे, कलाकारांच्या भावभावना किती उत्कृष्ट पद्धतीने काढून घेता येतात, याचं आकर्षण जास्त असेल. दिग्दर्शक म्हणून इतक्या कमी युनिटमध्ये चित्रीकरण करून नवीन भाग वाहिन्यांपर्यंत पोहोचवायचे ही कठीण जबाबदारी आहे; पण मुंबईतही आधीपासूनच कमी युनिटमध्ये चित्रीकरण करत होतो, त्यामुळे टीमलाही एकमेकांना धरून काम करण्याची सवय लागली आहे.  सोमवारपासून मालिके चे नवे भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. – अजय मयेकर, दिग्दर्शक – येऊ कशी तशी मी नांदायला

‘पहिल्यांदाच बाहेर चित्रीकरण’

अगदी तीस जणांचं आमचं युनिट इथे राजकोटमध्ये चित्रीकरणासाठी आलेलं आहे. राजकोटमध्ये अनेक जुन्या हवेली, महाल आहेत. त्यातल्याच एका महालात आम्ही चित्रीकरण करतो आहोत. या महालाच्या मागच्या बाजूला चित्रीकरण आणि आत आमच्या खोल्या, राहण्याची-जेवण्याची व्यवस्था आहे. जेवणही इथेच बनवलं जातं, त्यासाठीही बाहेर पडता येत नाही. या महालाच्या बाहेर कोणाशीही आमचा संपर्क येणार नाही यासाठी कसून काळजी घेतली जाते आहे. राजकोटपासून ६०-७० किमी दूर असलेल्या वाकानेर गावातील एका महालात आमची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे मुख्य शहरापासून आम्ही खूप आत आहोत.  सगळं जागच्या जागी करत असल्याने एक प्रकारचा कं टाळाही येतो. या सगळ्याशी जुळवून घेत चित्रीकरण करतो आहोत. खरं तर आमच्या कथेनुसार आम्हाला सहा ते सात दिवस बाहेर चित्रीकरण करावंच लागणार होतं. आता या परिस्थितीमुळे निदान महिनाभर तरी इथेच चित्रीकरण करावे लागणार असल्याने कथेत वेगळ्या पद्धतीने हा बदल विस्तारित स्वरूपात के ला गेला आहे. त्याअनुषंगाने चित्रीकरण करण्याचा हा आमचा पूर्ण वेगळाच अनुभव ठरणार आहे. – हर्षद अतकरी, अभिनेता – फु लाला सुगंध मातीचा