बॉलिवूडमधील ‘खानदान’ परिवारातली तीनही भावडं आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जातात. या तिघांपैकी सलमान खानने विशेष लोकप्रियता मिळविली असून आजही त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतात. त्याच्या तुलनेमध्ये अरबाज आणि सोहेल फारशी प्रसिद्धी मिळवू शकले नाही. अरबाज सध्या रिअॅलिटी शो करत असून त्याच्या वाट्याला जे काही शो किंवा चित्रपट येतात ते सलमानमुळे येत असल्याची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र साऱ्यावर अरबाजने त्याचं मौन सोडलं आहे. “कलाविश्वात मी जे स्थान मिळविलं आहे. ते स्वकर्तृत्वावर मिळवलं असून सलमानचा यात कोणताही हात नसल्याचं त्याने सांगितलं”.

“आतापर्यंत मला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून मी ७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र या चित्रपटांमध्ये माझी मेहनत दिसली आहे. मला जी कामं मिळाली ती माझ्या स्वकर्तृत्वावर मिळाली असून मी मेहनत केली त्यामुळेच आज हे चित्रपट मला मिळाले. मी सलमानचा भाऊ आहे या गोष्टीचा आणि मला मिळालेल्या कामाचा काही संबंध नाही. त्याने कोणतीही वशिलेबाजी करुन आम्हाला काम मिळवून दिलं नाही. जी कामं मिळाली ती स्वकर्तृत्वावर”, असं अरबाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मी सलमानचा भाऊ असल्याच्या नात्याने चित्रपट दिग्दर्शक मला फार-फार तर एक-दोन चित्रपट देऊ शकतात.मात्र आयुष्यभर तर मला त्याच्या नावाने काम मिळणार नाही ना ? माझं करिअर मलाच घडवावं लागेल. ते माझ्याशिवाय अन्य दुसरी कोणतीही व्यक्ती करु शकत नाही. चांगलं किंवा वाईट मी जे काही काम केलं ते माझ्या हिमतीवर केलं त्यामुळे आज मी या कलाविश्वात उभा आहे ते केवळ माझ्या मेहनतीमुळेच”.

दरम्यान, अरबाजने अब्बास मस्तान यांच्या ‘दरार’ याचित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री जुही चावलाने स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर अरबाज अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. यापैकी काही हिट ठरले तर काही अपयशी झाले. अरबाजने ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हॅलो ब्रदर’, ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’, ‘हलचल’ आणि ‘‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ हे सुपरहिट चित्रपट केले आहेत.