News Flash

स्थितिशील स्पर्धेत सुशांत..

प्रेक्षकांकडील पडद्यावर थेट चित्रपट नेणाऱ्या या क्षेत्रात फार कमी कंपन्या आज आहेत.

डॉ. आशीष थत्ते

ऑलिगोपोली म्हणजे मोजक्या बडय़ा स्पर्धकांनी आपसांत टिकवलेली, स्थितिशील स्पर्धा. चित्रपट ‘उद्योगा’तही ती असल्याचे सुशांतसिंह राजपूतच्या निमित्ताने पुन्हा उघड झाले. ‘स्टारकिड्स’ची चर्चा नवी असेल; पण ही अशी स्पर्धा आजचीच आहे का?

सुशांतसिंह राजपूत गेला आणि बऱ्याच चर्चाना उधाण आले. आपण चित्रपटांना इंडस्ट्री म्हणजे उद्योगाचा दर्जा दिला आहे आणि ज्या व्यावसायिक पद्धतीने चित्रपट बनवले जातात त्याला उद्योग म्हणणे बरोबरच आहे. चित्रपट उद्योग हा फक्त हिंदीपुरता सीमित नसून प्रादेशिक भाषांतही पसरलेला आहे. टीव्हीवरील कार्यक्रम किंवा जाहिराती सगळे मिळून करमणूक उद्योगक्षेत्र बनते. हा उद्योग काही हजार कोटींचा आहे. उद्योग म्हटल्यावर स्पर्धा ही आलीच. उद्योगांमधील स्पर्धा हा अर्थशास्त्राचा आवडता विषय. या उद्योगातही स्पर्धा आहेच आणि तसे कलाविश्वाशी संबंधित असल्यामुळे खेळाडू कमी आणि उलाढाल खूप जास्त असे व्यस्त गणितही आहे. जसे कुठल्याही उद्योगामध्ये मागणी तसा पुरवठा असे तत्त्व असते तसेच या मनोरंजन उद्योगतही असते. फक्त मागणी नक्की कुठल्या प्रकारच्या मनोरंजनाची आहे हे ओळखून पुरवठा करावा लागतो. या उद्योगातील धुरंधर मागणी लगेच ओळखतात आणि पुरवठा करतात. अर्थात हा विषय कलेशी निगडित असल्यामुळे प्रेक्षकांची नस ओळखणे अजिबात सोपे नसते. सलमान खान एकाच धाटणीचे चित्रपट देऊन सतत यशस्वी होतो, तर आमीर खानला कदाचित यशस्वी होण्यासाठी वेगळे विषय आणि वेगळा आशयही लागतो. ‘चक दे इंडिया’नंतर खेळांवर आधारित चित्रपट आले, यशस्वी झाले.

कलाविश्वातील इतर गोष्टी सध्या बाजूला ठेवून याकडे फक्त उद्योग म्हणून पाहू. उद्योगातील स्पर्धा ही मुखत्वे चार प्रकारची असते. मोनोपॉली (एकाधिकारशाही) ते परफेक्ट कॉम्पिटिशन (पूर्ण स्पर्धा) आणि मध्ये असतात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन (मक्तेदारी स्पर्धा) आणि ऑलिगोपोली (अल्पिष्ठाधिकार). जागतिकीकरणाच्या रेटय़ात आपणही मोनोपॉलीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे अविवादित मोनोपॉली किंवा मोनोपॉली बाजारपेठ आता अस्तित्वात नसते. काही क्षेत्रांत ती असू शकते- जसे संरक्षण उत्पादने. किंवा काही वर्षांपूर्वी विमाक्षेत्रात आयुर्विमा महामंडळाची एकाधिकारशाही होती. जगातल्या सर्वच सरकारांनी एकाधिकारशाहीवरती कायदेशीर बंधने घातली आहेत. करमणूकक्षेत्रातही अशी एकाधिकारशाही अस्तित्वात नाही. दुसऱ्या बाजूला सर्व बाजारपेठा या स्पर्धात्मक असतात आणि त्यामुळे होतो तो मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन (मक्तेदारी स्पर्धा) ते ऑलिगोपोली (अल्पिष्ठाधिकार) पर्यंत पोहोचण्याचा प्रवास.

करमणूकविश्वाच्या ‘खुल्या बाजारपेठे’त प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे किंवा तुम्ही वेगळे असल्यापेक्षा करमणूक करू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकार चित्रपट किंवा मालिका निवडताना नेहमी विचार करतो आणि या मुक्त बाजारपेठेत मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन सुरू होते. अक्षयकुमार म्हटले की एका प्रकारचे चित्रपट, तर इम्रान हाश्मी म्हणजे जरा वेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहावयास मिळतात. प्रत्येक कलाकार त्याची वैशिष्टय़े घेऊन या बाजारपेठेत मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन सुरू करतो. नवीन कलाकार, दिग्दर्शक, निर्मिती संस्था सर्व मिळून आपापले वेगळेपण सिद्ध करतात.

देशभरातून तरुण आपली कला घेऊन या क्षेत्रात येतात. काही क्षेत्रीय बाजारपेठ व्यापतात तर काही राष्ट्रीय म्हणजे बॉलीवूड किंवा हिंदी. पुन्हा बॉलीवूड कलाकार क्षेत्रीय किंवा जाहिरात बाजारपेठासुद्धा व्यापतात तसेच उलटेदेखील. मग सुरू होते ती स्पर्धा. ती सुद्धा पैसा कमावण्याची आणि इथेच सगळा घोळ सुरू होतो. काही कलाकार याला निश्चित अपवाद आहेत जे कामातून ज्ञान मिळावे किंवा प्रेक्षंकाची निव्वळ करमणूक करावी अशा भावनेतून चित्रपटात काम करतात. म्हणून त्यांचा समाज नेहमी आदर करतो. अर्थात सगळे सारखे नसतात. बरेच जण स्पर्धा स्वीकारतात, वाहावत जातात.

एकदा तुम्ही मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचा भाग झालात की मग तुमची वाटचाल सुरू होते ती ‘ऑलिगोपोली’ मिळविण्याच्या दृष्टीने. कारण कुणीही मोनोपॉली मिळवू शकत नाही याची जाणीव सर्वानाच असते. पण मोनोपॉलीसारखी दिसणारी ऑलिगोपोली हेच वास्तव आहे आणि तेच आपण मिळवू शकतो याची खात्री झाल्यावर हळूहळू कलाकारांची पावले तिथे पडू लागतात आणि त्यातून निर्माण होतात ऑलिगोपोलीशी संबंधित समस्या.

सगळ्यात पहिले म्हणजे नवीन खेळाडूंना प्रवेशात अडथळे किंवा बंदी किंवा ‘एण्ट्री बॅरियर’. कलाविश्वात आता जेव्हा या गोष्टींची चर्चा होत आहे तेव्हा समजते की, नवीन कलाकारांना कशा प्रकारे अडथळे आणले जातात. बाजारपेठेत ज्या काही ऑलिगोपॉलिस्टिक कंपन्या आहेत त्या उदयोन्मुख कलाकारांना पुढे येऊ देत नाहीत किंवा त्यांना जास्त वाव मिळू देत नाहीत. सुशांतच्या निमित्ताने भारतातील या कंपन्यांची चर्चा आज होते आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिव्हर्सल, सोनी आणि वॉर्नर ब्रदर्स यांनी ऑलिगोपोली स्थापन केलेलीच आहे.

ऑलिगोपोलीचा आणखी एक तोटा म्हणजे नवीन संशोधनाला अडथळे. एकाच पद्धतीच्या मालिका, चित्रपट देऊन नवीन काही करायला वाव दिला जात नाही. काही वर्षांनी ‘दबंग २५’, ‘सिंघम २४’ आणि ‘बागी २३’ अशा नावांचे ‘नवे’(!) चित्रपट आले तर विशेष काही वाटायला नको. त्यात पैसा असल्यामुळे नवकलाकाराला आकर्षून घ्यायचे आणि बाहेर पडून नवीन काही करावयास गेला तर बहिष्कृत करायचे हे ऑलिगोपोलीचे वैशिष्टय़. हे न केल्यास बाजारपेठ पुन्हा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन होऊन जाईल. स्पर्धा स्थितिशील राहणार नाही.

ऑलिगोपोलीचे आणखी वैशिष्टय़ म्हणजे परस्परावलंबन. काही मंडळी एकत्र येऊन जेव्हा आपली मक्तेदारी प्रस्थापित करतात तेव्हा त्यांची एकमेकांशी स्पर्धा होणार नाही याची काळजी घेतली जाते. किंबहुना स्पर्धक काय करेल याचा अंदाज नक्की असतो आणि पावले त्याप्रमाणे उचलली जातात. कोणत्याही उद्योगांमध्ये उत्पादनच्या किमती किंवा सवलती दिल्यानंतर इतर कंपन्या काय करतील याचा अंदाज आधीच करून ठेवलेला असतो व सर्व ऑलिगोपॉलिस्टिक कंपन्या एकाच दिशेने जातात. तसेच मोठय़ा बॅनरचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत नाहीत किंवा चांगल्या टीआरपी असणाऱ्या मालिका एकाच वेळेला दाखवल्या जात नाहीत. जर वाद असले तर परस्परांशी बोलून ही समस्या सोडवली जाते. ‘रईस’ आणि ‘सुलतान’ चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी काय झाले ते आपण बघितले आणि ते होतच असते. बरे ऑलिगोपोली ही समस्या काही आजची नाही. संगीतक्षेत्रात मंगेशकर भगिनी, मुकेश, किशोर यांच्याशिवाय गाणी बनत नव्हती. तिकडे दक्षिणेकडे एस पी बालसुब्रमणियम यांनी विश्व व्यापून टाकले होते. राजेश खन्नासारखा कलाकार चित्रपटाच्या एकूण बजेटच्या सुमारे साठ टक्के फी घायचा. या जुन्याच स्थितिशील स्पर्धेच्या व्यवस्थेत आता ‘स्टारकिड्स’ असा नवीन खेळाडू निर्माण झाला.

ऑलिगोपोलीचे परस्परावलंबन फक्त चित्रपट तारखांपुरते नसून ते पुरस्कार, टीव्ही शो, मुलाखती वगैरेलादेखील लागू होते. सिनेमाच्या तारखांपासून ते थिएटरे मिळण्यापर्यंत नव्या लोकांचे मार्ग बंद केले जातात. परत ऑलिगोपोलीत स्थिरावलेल्या कंपन्या प्रचंड जाहिरातबाजी करून कमी वेळात जास्त फायदा कमावण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरी एक चित्रपट १०० कोटींचा धंदा करूनही त्यावर फ्लॉप हा शिक्का मारला गेला होता! कुठल्याही नवशिक्याला पैशांचे हे गणित जमणे कठीण असते. परत प्रयत्न केला आणि पदरी अपयश पडले की खूप नुकसान होऊ शकते.

यात यशस्वी होण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. ऑलिगोपोली इतक्या सहजासहजी मोडीस निघत नाहीत. प्रेक्षकांची एखाद्या कलावंतावर असणारी श्रद्धा व निष्ठा संपवणे जितके कठीण; तितकेच ऑलिगोपोली मोडणे कठीण. ‘स्टारकिड्स’ ही नवीन व्यवस्था आपल्या पालकांच्या भरवशावर प्रेक्षकांची निष्ठा आपोआप मिळवते. त्यामुळे दोन नवीन कलावंतांमध्ये स्टारकिड्स बाजी मारून जातात आणि ऑलिगोपोलीकडे जलतगतीने वाटचाल करतात. आता ‘ओटीटी’मध्येही पुन्हा ऑलिगोपोली चालू होईलच. प्रेक्षकांकडील पडद्यावर थेट चित्रपट नेणाऱ्या या क्षेत्रात फार कमी कंपन्या आज आहेत. पण जेव्हा ग्राहकांची पसंती व निष्ठा मिळू लागेल, तेव्हा तेही क्षेत्र ऑलिगोपोलीच्या दिशेने वाटचाल करू लागेल. किंबहुना एक ऑलिगोपोली हटवणे म्हणजे तेवढीच मोठी आणखी एक ऑलिगोपोली निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. या प्रयत्नात मोठय़ा कंपन्या कदाचित मोडीस निघू शकतात.

कायद्याने फक्त मक्तेदारी किंवा मोनोपॉलीवर अंकुश आणला आहे, पण जगात ऑलिगोपोलीवर नियंत्रण आणण्याचे कायदे विकसित झालेले नाहीत. सध्या बरीच व्यासपीठे निर्माण झाली आहेत (उदाहरणार्थ समाजमाध्यमे, ओटीटी) आणि त्यांचा कदाचित वापर करून घेता येऊ शकतो. अर्थात हे अतिशय कठीण काम आहे, पण आजही कित्येक कलावंत हे करत आहेत. यात उमेदीची वर्षे निघून गेल्यास हाती काहीच पडत नाही आणि पदरी मात्र निराशा येते. सुशांतला नेमक्या याच ऑलिगोपोलीची तीव्र जाणीव झाली असावी. त्याने उचललेले पाऊल हे अतिशय टोकाचे होते आणि त्यामुळे ऑलिगोपोली हटवण्याच्या कामी कितपत फायदा उरलेल्यांना होईल अशी शंका आहेच.

सामाजिक विज्ञानाचे मूळ हे अर्थशात्रात असते असे म्हणतात, हेच सुशांतच्या दु:खद मृत्यूनंतर पुन्हा अधोरेखित झाले आहे.

ashishpthatte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 2:12 am

Web Title: oligopoly issue discussion in bollywood actor sushant singh rajput suicide zws 70
Next Stories
1 मराठीतून हिंदीत जाताना..
2 घराणेशाहीच्या वादावर फरहान अख्तरची प्रतिक्रिया; म्हणाला..
3 आषाढी एकादशीनिमित्त सावनी रविंद्रचा पहिल्यांदा ऑनलाइन लाइव्ह कॉन्सर्ट
Just Now!
X