सुहास जोशी

लोकप्रिय कलाकृती जशीच्या तशी उचलून दुसऱ्या भाषेत तिचा रिमेक करणे हा बहुतांशवेळा खपून जाणारा, यशस्वी ठरणारा प्रकार असतो. पण जेव्हा फसतो तेव्हा तो चांगलाच सपाटून आपटतो. त्यातही विवाहबाह्य़ संबंध असा घासूनघासून गुळगुळीत झालेला विषय असेल तर अगदी प्रथितयश दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कलाकार असले तरीदेखील असा प्रकार अगदीच गुळमुळीत होऊन जातो. गेल्या वर्षभरात ‘हॉटस्टार’ने परदेशात हिट झालेल्या वेबसीरिज भारतीय भाषांमध्ये रिमेक करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यातील काही सीरिज यशस्वी झाल्या. पण वर्ष संपताना आलेली ‘आऊट ऑफ लव्ह’ ही सीरिज अगदीच बालिश म्हणावी अशी ठरते.

तामिळनाडू येथील कूनूर या निसर्गरम्य अशा गिरिस्थानावर हे कथानक घडते. तेथील स्थानिक इस्पितळात डॉ. मीरा (रसिका दुग्गल) ही कार्यरत असते. चाळिशीतला तिचा पती आकर्ष (पूरब कोहली) हा वास्तुविशारद आणि इस्टेट एजंट असतो. डोंगरात वसलेला टुमदार बंगला, गर्द वनराईतील शाळा, आटोपशीर रस्ते, चहाचे विस्तीर्ण मळे वगैरे सारी वैशिष्टय़े असलेले हे गाव. एखादे आदर्श त्रिकोणी कुटुंब असावे असे डॉ. मीरा यांचे आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू असते. पण नेमका त्याचवेळी आपला नवरा आपल्याला फसवतोय याचा सुगावा तिला लागतो. त्याचा माग काढण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते. त्यातून तिच्या हाती बरीच माहितीदेखील लागते. नवऱ्याने फसवल्यामुळे तिचा स्वाभिमान दुखावतो, त्यामुळे घटस्फोटाचा प्रयत्न करते. पण पुन्हा आर्थिक डोलाऱ्याची जाणीव झाल्यानंतर दोन पावले मागे जाते. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळत जाते. डॉ. मीरा घटस्फोट घेते की नाही, आकर्षचे काय होते यात पुढील तीन एपिसोड खर्ची पडतात.

इनमीन पाच भागांची ही वेबसीरिज आहे. कथानकाचा जीव अगदीच छोटा. कूनूर शहराच्या बाहेरदेखील न जाणारा इतका छोटा. पण त्याला ना खोली आहे ना लांबी रुंदी. एकतर भारतीय दूरचित्रवाणीच्या मालिका विश्वात विवाहबाह्य़ संबंध हा विषय इतक्यांदा, इतक्या वेगवेगळ्या प्रकारे वापरून झालाय, की त्यात आता काही नावीन्य उरलेले नाही. मुळात इंग्रजीतील डॉ. फॉस्टर या सीरिजवरून उचललेले हे कथानक आहे. तेथील समाजजीवन आणि भारतीय समाजजीवन यात बराच फरक आहे. त्यामुळे काही प्रमाणात कथेला भारतीय रूप देण्यात सीरिजकर्ते यशस्वी झाले आहेत हा त्यातला त्यात एक समाधानाचा भाग. पण कथेमध्ये जो काही नावीन्य नावाचा प्रकार आहे तो इतका मर्यादित आहे की त्यामुळे पूर्ण सीरिजमध्ये काही नावीन्य जाणवत नाही. किंबहुना सुरुवातीच्या टप्प्यावर अगदीच टिपिकल पद्धतीने कथा पुढे सरकते. नवऱ्याच्या स्कार्फमध्ये सापडणारा रंगीत लांब केस, बॅगेत पडलेली लिपस्टिक वगैरे वगैरे.

या वेबसीरिजचे सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रथितयश आणि वेगळ्या वाटेवरच्या तिग्मांशु धुलियाचे दिग्दर्शन. एकतर रिमेकसारख्या प्रकारात स्वतंत्र वृत्तीच्या दिग्दर्शकाची योजना करण्यातून नेमके काय साधले हाच प्रश्न पडतो. जोडीला अजिझ खानदेखील आहेत. मात्र या सर्वामुळे सीरिजमध्ये सुतराम फरक पडत नसल्याने हा सगळा खटाटोप कशासाठी हाच प्रश्न पडत राहतो. फार फार तर पात्रांची योग्य निवड आणि अशाप्रकारचे छापील गटातील टीव्ही मालिकांमधील भोंगळपणा यात दिसत नाही इतकेच काय ते नावीन्य उरते.

असे असले तरी कथानकातील काही भाग प्रेक्षकाला विचारात पाडणारे आहेत. मात्र ते कथेच्या नावीन्यामुळे नव्हे तर केवळ आणि केवळ बालिशपणामुळे. कैक ठिकाणी प्रेक्षकाला वाटत राहते की आपल्या समाजात खरेच असा मूर्खपणा ठासून भरला आहे का? आत्ता हा बालिश आणि मूर्खपणा मूळ मालिकेत असेल तर बोलण्यात काहीच अर्थ नाही. आकर्षचे सुरू असलेले विवाहबाह्य़ प्रकरण मीराच्या आसपासच्या अनेकांना माहिती असते आणि त्यातील अनेकांचा ग्रह असतो की मीरालादेखील याची कल्पना आहे. आणि त्याचवेळी ज्या मुलीबरोबर हे प्रकरण सुरू असते तिच्या आई-वडिलांना याची सुतराम कल्पना नसते. हिल स्टेशन असलेल्या त्या छोटय़ाशा शहरात हे घडत असेल यावर विश्वासच बसत नाही. काल्पनिक कथानक म्हणून हे सोडून दिले तरी पाच भागांची ही मालिका पाहावी असे यात काही नाही.

त्यातल्या त्यात एक बरा भाग म्हणजे निसर्गरम्य पाश्र्वभूमीचा अतिशय चपखल असा वापर सीरिजकर्त्यांनी केला आहे. कथानक त्याच ठिकाणी घडत असताना केवळ बंगल्यात बंदिस्त न करता चार भिंतीबाहेर येताना त्यात जरा नयनरम्यता येते इतकाच काय तो बदल. कथेच्या अनुषंगाने डॉ. मीराच्या इस्पितळातील काही इतर प्रसंग वगैरे यात येतात. पण त्याने कथेत फारसा फरक पडत नाही.

हॉटस्टारने पूर्णपणे भारतीय मूळ कथानकावर बेतलेल्या वेबसीरिज करण्यापेक्षा वर्षभरात रिमेक करण्यावरच भर दिला आहे. त्यातील क्रिमिनल जस्टीस, होस्टेजेस अशा मालिका काही अंशी यशस्वी ठरल्या आहेत. यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनादेखील वाव मिळाला आहे. त्याचा फायदादेखील झाला आहे. मात्र यावेळी हा रिमेक प्रयोग पूर्णपणे फसला आहे. चांगले कलाकार, उत्तम दिग्दर्शक असूनदेखील न रुचणारे, न पचणारे प्रकरण साकारले आहे.

आऊट ऑफ लव्ह

सीझन – पहिला

ऑनलाइन अ‍ॅप – हॉटस्टार