छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंग लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत असून सध्या ते लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

पायल आणि संग्रामचा विवाहसोहळा नोव्हेंबरमध्ये पार पडणार असून २०१४ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर वर्षभरातच लग्न करण्याचा आमचा विचार होता, मात्र कामाच्या व्यापामुळे लग्न पुढे ढकलत राहिलो, अशी प्रतिक्रिया संग्रामने दिली आहे.

payal and sangram
पायल रोहतगी, संग्राम सिंग

संग्राम हा कुस्टीपटी, अभिनेता आहे. तो बिग बॉसमध्येही झळकला होता. पायलनंही छोट्या पडद्यावर तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. ‘प्लान’, ‘रक्त’, ‘३६ चायना टाऊन’, ‘दिल कबड्डी’ यांसारख्या चित्रपटांत ती झळकली होती. ‘बिग बॉस’नंतर या दोघांनी ‘नच बलिये’ या रिअॅलिटी शोमध्येही एकत्र भाग घेतला होता.

यावर्षी बरेच टीव्ही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. गौतम रोडे- पंखुडी अवस्थी, रुबिना दिलैक- अभिनव शर्मा, गौरव चोप्रा- हितीशा यांनंतर आता पायल आणि संग्रामसुद्धा लवकरच जीवनाच्या एका प्रवासाला सुरुवात करणार आहेत.