बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी मिळत असल्याचं सांगत मॉडेल पूनम पांडेने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. पूनमने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना टॅग करत ही माहिती दिली. माझा मोबाइल क्रमांक एका फेक अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून माझ्या तक्रारीची दखल घ्या,असंही तिने सांगितलं.

“माझा मोबाइल क्रमांक एका अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे. याबाबत मी गुगलकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र अद्यापपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. मला निनावी फोनवरुन बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी मिळत आहे. त्यामुळे मी दिवसभर भीतीच्या छायेत वावरत आहे. त्यामुळे कृपया मला मदत करा”, असं ट्विट पूनमने केलं आहे. तिच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी त्वरीत रिप्लाय देत मदतीचं आश्वासन दिलं आहे.

“आम्ही तुमच्या तक्रारीची दखल घेत आहोत. फक्त तुमचा संपर्क क्रमांकाविषयी आम्हांला(DM) थेट मेसेज करावा”, असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, एकीकडे हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तर दुसरीकडे पूनम पांडेने अॅसिड हल्ला आणि बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनीही तात्काळ उत्तर देत, आपली भूमिका बजावली आहे.