पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बायोपिक येत्या २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते.

मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. येत्या २३ मे ला निवडणुकीच्या निकालानंतर लगेच २४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावर निर्माते आनंद पंडीत म्हणाले, ‘लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे, याहून आनंदाची गोष्ट आमच्यासाठी कोणतीच नाही. प्रदर्शनाच्या तारखेला घेऊन आजपर्यंतचा चाललेला प्रवास अतिशय खडतर होता. परंतु आम्हाला आशा आहे की येत्या २४ मे रोजी हा चित्रपट कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रदर्शित होईल. लोकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.’

ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे. बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.