News Flash

रात अकेली है! : एका खुनाच्या रहस्याची रंजक उकल!

जरुर पाहावा असा रंजक सिनेमा

समीर जावळे

सत्य काय आहे? आपल्याला समोर दिसतं तेवढंच? डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो तेच सगळं खरं की त्यापलिकडेही त्याला काही अर्थ असतो? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे होय त्या पलिकडेही या सगळ्याला अर्थ असतो. हे सगळं मांडण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पाहिलेला एक सिनेमा. रात अकेली है! Netflix वर हा सिनेमा रिलिज झाला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, तिग्मांशू धुलिया, आदित्य श्रीवास्तव, इला अरुण, निशांत दहिया, स्वानंद किरकिरे, खलिद त्याबजी या सगळ्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा म्हणजे एक मर्डर मिस्ट्री आहे. खरं तर हिंदी सिनेसृष्टीला मर्डर मिस्ट्री हा विषय काही नवा नाही. आजवर या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही रात अकेली है हा सिनेमा वेगळा आणि हटके ठरतो. त्याचं कारण या सिनेमातलं रहस्य.

काय आहे कथा?

या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक खून होतो. हा खून एका हवेलीत झालेला असतो. ज्याचा खून झालेला असतो तो एक अय्याश ठाकूर आहे. त्यानंतर मग एंट्री होते ती इन्स्पेक्टर जटिल यादव अर्थात नवाजुद्दीन सिद्दीकीची. तो या खुनामागचं सत्य शोधून काढतो. फक्त सत्यच शोधून काढत नाही तर अनेक गोष्टींचा उलगडाही करतो. या सगळ्यात त्याच्या मार्गात अडथळे आणण्याचं काम सोयीस्कर पद्धतीनेही केलं जात असतं. तरीही सगळ्या अडचणींवर मात करुन तो अंतिम सत्यापर्यंत पोहचतो. त्याचा हा सगळा प्रवास म्हणजे रात अकेली है हा सिनेमा! आपण प्रेक्षक म्हणून अडाखे बांधत असतो की कुणी खून केला असेल? ते सगळे अंदाज, अडाखे चुकीचे ठरतात. असा सिनेमाचा शेवट आहे. असं नेमकं का घडतं? ते पाहण्यासाठी हा सिनेमा आवर्जून पाहिलाच पाहिजे.

लोभ, खोटारडेपणा, क्रोध, चमकोगिरी, पैशासाठींचं हपापलेपण हे सगळे माणसाच्या ठायी भरलेले अवगुण आणि त्या अवगुणांसहीत वावरणारी पात्रं या चित्रपटात दिसतात. अशा सगळ्या पात्रांमध्ये राहून नवाजुद्दीन सिद्दीकी अंतिम सत्यापर्यंत पोहचतो. एका बड्या हवेलीत झालेला खून.. आणि तो खून का आणि कसा झाला हे दाखवण्याचं कसब दिग्दर्शकाने अचूक साधलंय. हनी त्रेहान दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी हनी त्रेहानने तलवार, दिल्ली बेली, उडता पंजाब या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.

 

सिनेमात हनी त्रेहानची दिग्दर्शकीय कौशल्यं दिसून येतात ती त्याच्या पात्र निवडीवरुन. आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धुलिया, राधिका आपटे असे सगळे असले तरीही भाव खाऊन गेला आहे तो नवाजुद्दीन सिद्दीकी. त्याची डायलॉगबाजी, त्याची खुनामागचं रहस्य शोधून काढण्याची धडपड हे सगळं प्रेक्षक म्हणून आपल्याला अस्वस्थ करत राहतं. हीच त्याच्या अभिनयाला मिळालेली पोचपावती आहे असं म्हणता येईल. नवाजुद्दीनने रंगवलेला गणेश गायतोंडे हा सेक्रेड गेम्समधला डॉन जितका भारी वठवला आहे तितकाच या सिनेमातला पोलीसही. दोन्ही भूमिकांचे बाझ वेगळे आहेत. नवाजने या सिनेमातल्या जटिल यादवलाही त्याच्या अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

सिनेमाला दिलेलं रात अकेली है! हे शीर्षकही महत्त्वाचं ठरतं कारण एका रात्रीत काय काय घडलेलं असतं… आणि एकेका रात्रींची साखळी इन्स्पेक्टर जटिल यादव कसा जोडत जातो ते पाहणं रंजक झालंय. सिनेमाची सुरुवात ते शेवट हा सिनेमा आपल्याला बांधून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. आजवर तलवार, तलाश, स्टोनमॅन मर्डर्स, रमन राघव 2.0, खामोश, तिसरी मंझिल असे अनेक सिनेमा येऊन गेले आहेत ज्यांचा मुख्य धागा हा एका खुनाची उकल हा होता. रात अकेली है हा सिनेमा अगदी त्याच पठडीतला ठरतो.

सगळ्या कलाकारांनी केलेला दमदार अभिनय ही सिनेमाची विशेष जमेची बाजू. राधिका आपटे, तिग्मांशू धुलिया, आदित्य श्रीवस्ताव, इला अरुण या सगळ्यांचाच अभिनय चांगला झाला आहे. त्यामुळे सिनेमा पाहतानाची रंगत वाढते. अॅक्शन सिक्वेन्स, सिनेमॅटोग्राफी या सगळ्या तांत्रिक गोष्टींमध्येही सिनेमा सरस ठरला आहे. सध्या लॉकडाउन असल्याने आणि मल्टिप्लेक्स, थिएटर बंद असल्याने हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आहे. रहस्यकथा पाहण्यास आवडत असल्यास सव्वा दोन तास फूकट जाणार नाहीत हे नक्की!

sameer.jawale@indianexpress.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 5:49 pm

Web Title: raat akeli hai movie review a must watch movie on netflix scj 81
Next Stories
1 …म्हणून मी अद्यापही करोना पॉझिटिव्ह, अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली माहिती
2 अखेर अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट आला निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
3 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन
Just Now!
X