आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुका पाहता राजकीय चित्रपटांचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये हातपाय पसरत आहे. याची सुरूवात झाली ती ‘उरी’ या चित्रपटापासून. त्यानंतर ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘ठाकरे’, यांसारखे राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही गेल्या महिन्यात प्रदर्शित झाले. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारीत ‘माय नेम इज रागा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. गांधी कुटुंबीय विशेषत: राहुल गांधी यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. इंदीरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल यांच्या आयुष्यात झालेला मोठा बदल ते राजकारणातील त्यांचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. रुपेश पॉल या चित्रपटाचा दिग्दर्शक असणार आहे. रुपेशनं ‘सेंट ड्रॅक्यूला’, ‘कामासुत्रा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टीझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे. यापूर्वी राहुल गांधी यांच्यावर आधारित चित्रपट येणार अशी कोणतीही चर्चा बॉलिवूडमध्ये नव्हती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे चित्रपटासाठी खुद्द राहुल गांधी यांनी होकार दिला होता का हेदेखील समोर आलेलं नाही. २०१९ च्या निवडणुका पाहता राजकीय हेतूसाठी हा चित्रपट काढला असावा अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

मात्र या चित्रपटात कोणताही छुपा अजेंडा नसून हा चित्रपट तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास दिग्दर्शक पॉलनं व्यक्त केला आहे.