गेल्या वर्षी करोनाचे वाढते संक्रमण पाहता लॉकडाउन करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा परिणाम हा फक्त सामान्य नागरिकांवर नाही तर सेलिब्रिटींवर देखील झाला होता. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या. आता पुन्हा एकदा लॉकडाउन लागल्याने पुन्हा एकदा परिस्थिती बिकट झाली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सुनील नागर यांच्यासोबत ही असेच झाले आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. करोनाच्या काळात तर इंडस्ट्रीसोबतच त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांना सोडून गेले.

सुनील यांची परिस्थिती ऐवढी बिकट झाली की त्यांना ओशिवारा येथील त्यांचे घर विकावे लागले. आता ते भाड्याचा घरात राहत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा फोटो आणि त्यांच्या बॅंकेची माहिती शेअर करण्यात आली आणि त्यांनी मदतीसाठी विनंती केली आहे.

‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, “मला कोणाकडूनही मदत मागायची नाही, पण परिस्थितीच अशी आहे. जेव्हा मी माझ्या एका कास्टिंग डायरेक्टर मित्राला सगळी परिस्थिती सांगितली तेव्हा त्याने माझा फोटो आणि बँकेचे माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि मला सांगितले की मदती मागण्यासाठी हा सर्वात चांगला मार्ग आहे,” असे सुनील म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “CINTAA ने देखील माझ्याशी संपर्क साधला आणि मला मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यात आणखी किती वेळ लागेल हे माहित नाही. कोणाला दोष द्यायचा हे मला कळतं नाही. मी काम करत असताना खूप पैसे कमवले. मी छोट्या पडद्यावरील बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. बर्‍याच चित्रपटांमध्ये देखील काम केले. लोकांना माझं काम ही आवडलं. त्यांनी मला कामही दिलं. पण आज इंडस्ट्रीमध्ये आमच्यासारख्यांसाठी काम नाही.”

सध्या ते काय करत होते याबद्दल सुनील यांनी पुढे सांगितलं. ते म्हणाले, “मी एक गायक सुद्धा आहे. त्याचे मी प्रशिक्षण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी मला एका रेस्टॉरंटमध्ये गाण गाण्याची ऑफर मला मिळाली होती. तिथले लोक माझा उर्वरीत खर्च देखील पाहत होते, पण त्यानंतर लॉकडाउन झालं. रेस्टॉरंट बंदही पडले. यामुळे मला गेल्या काही महिन्यांपासून घराचे भाडे देखील भरता आले नाही. ”

फक्त इंडस्ट्री नाही तर सुनील यांना त्यांच्या कुटुंबाकडून देखील काही मदत मिळतं नाही आहे. सुनील यांचे आई-वडील आता एकत्र राहतं नाही आणि त्यांना त्यांच्या मुलाकडून कोणतीच आशा नाही. कुटुंबीयांनीही त्यांचा त्याग केला आहे. सुनील म्हणाले, “लोकांना वाटतं असेल की ज्या अभिनेत्याकडे एकेकाळी इतका पैसा होता, ज्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते, अशा परिस्थितीत तो कसा येऊ शकतो? त्याची अशी परिस्थिती कशी होऊ शकते??”

या बद्दल ते पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी वैयक्तीक नुकसान झाले. मी त्याबद्दल सांगू शकत नाही, परंतु माझे पैसे देखील तिथेच होते. माझ्या कुटुंबाने मला सोडून दिले. मी माझ्या मुलाला चांगले शिक्षण दिले. कॉन्व्हेंट शाळेत शिकवले आणि आज मी कुठे आहे ते पाहा. माझे भाऊ-बहीण आहेत, पण त्यांनाही माझी काळजी नाही. देवाच्याकृपेने मला करोना नाही, परंतु इतर आरोग्य समस्या आहेत. मला आशा आहे की माझ्या आयुष्यातही एक नवीन पहाट लवकर येईल.”

रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ या मालिकेत त्यांनी पितामहा भीश्मची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी ‘महाबली हनुमान’, ‘ओम नम: शिवाय’, ‘श्री गणेश’ आणि ‘कबुल है’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.