करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. या भयानक परिस्थितीत करोना रूग्णांच्या मदतीला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन पुढे आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनने ऑक्सिजनपासून ते मेडिकल किट पर्यंत सर्व प्रकारची मदत करण्याचा विडा उचललाय. अभिनेत्री रवीना टंडनने दिल्लीसाठी ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवले आहेत. सोबतच रूग्णालयात औषधांच्या नावाखाली लोकांची लूट केली जात असल्याचं पाहून तिला राग अनावर झाला.

करोना काळात करोना रूग्णांची मदत करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडन गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर मदतीसाठीचे मेसेजेस मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी अभिनेत्री रवीना टंडनने तिची एक टीम बनवली आहे.

अभिनेत्री रवीना टंडन म्हणाली, “सध्या जे आपल्या आजुबाजूला घडतंय त्यावर विश्वास होत नाही…हे सारं काही एक विनाशाप्रमाणेच आहे…श्रीमंतवर्ग मोठ्या प्रमाणात खर्च करून करोनाचे इंजेक्शन आणि औषधं घेत आहेत…पण सामान्य जनतेची दुर्दशा होतेय…हे सगळं निराशाजनक आहे…म्हणनूच या काळात लोकांना मदत करण्यासाठी आम्ही स्वयंसेवक उभे केले आहेत, ते तुम्हाला तुमच्या एका मेसेजवर मदत करू शकतील.”

Instagram: @officialraveenatandon

यापुढे बोलताना रवीना टंडन म्हणाली, “ऑक्सिजन किट पासून ते ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन कन्संट्रेटर्स पर्यंत शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय…लोकांनी मदतीसाठी ट्विट केल्यानंतर ताबडतोब मदत पोहचवली जाते. इतकंच नाही तर ती मदत त्यांना मिळाली का याची आम्ही खात्री ही करून घेतो.” यापुढे बोलताना रवीना टंडनने या मोहीमेसाठी ज्यांना मदत करणं शक्य आहे त्यांनी पुढे येऊन मदत करावी, असं आवाहन देखील केलंय.

आपल्या देशात ऑक्सिजन सिलेंडर्सची कमतरता निर्माण झाल्याचं दिसताच अभिनेत्री रवीना टंडनने एक ट्रक भरून ऑक्सिजन सिलेंडर्सची व्यवस्था केलीये. हे सांगताना रवीना टंडनने लिहिलं की, “जे करोना रूग्ण ऑक्सिजन सिलेंडर्ससाठी खर्च करू शकत नाहीत अशा रूग्णांपर्यंत हे ऑक्सिजन सिलेंडर्स पोहचवले जाणार आहेत. यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या संपर्कात आहोत. दिल्लीसाठी ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवण्याची तयारी झालेली आहे.”

करोनाच्या या महामारीत ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर देखील अभिनेत्री रवीना टंडनने प्रतिक्रीया दिली आहे. “ऑक्सिजनचा काळाबाजार करणारे हे गिधाडाप्रमाणे आहेत, जे आपल्याला खात आहेत…”, असं बोलून अभिनेत्री रवीना टंडनने आपला राग व्यक्त केलाय.