प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. “डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेलने दिली होती. आता रेमोचा खास मित्र व कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अहमद म्हणाला, “रेमोला तातडीने रुग्णालयात नेल्याचं मला फोनवर सांगण्यात आलं होतं. आम्ही सर्वजण चिंतेत होतो पण आता त्याचा प्रकृती स्थिर आहे.” आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीत इतकं जागरुक राहणाऱ्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका यावा, याबाबत अहमदने आश्चर्य व्यक्त केलं. “जो व्यक्ती त्याच्या प्रकृतीबद्दल आणि फिटनेसबद्दल इतकी काळजी घेतो, त्याच्यासोबत असं घडावं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. रेमो सध्या आयसीयूत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रसिद्ध गाण्यांच्या कोरिओग्राफीशिवाय रेमोने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून होता.
‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून रेमोचं नाव चर्चेत आलं. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत त्याने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. नंतर याच रिअॅलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला आणि त्याचसोबत रिअॅलिटी शोमधून पुढे आलेले स्पर्धक सेलिब्रिटी म्हणून प्रकाशझोतात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 8:54 am