चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना त्या पदावरून काढून प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल, असे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी म्हटले आहे. उडता पंजाब या चित्रपटावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिटला. या चित्रपटामध्ये केवळ एक कट सुचवून त्याला अ प्रमाणपत्र देण्याची सूचना उच्च न्यायालयाने सीबीएफसीला केली. त्यानंतर मंगळवारी या चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.


अनुराग कश्यप म्हणाले, वाद निर्माण होतात. त्यावेळी चित्रपट व्यवसायाच्या क्षेत्रातील सर्वांनीच एकत्र येण्याची गरज असते. यावेळी तसे घडले. संपूर्ण बॉलिवूड आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. फक्त निहलानींना बदलून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल.
उडता पंजाब प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि त्याबद्दल मला नितांत आदरही आहे, असे अभिनेता शाहिद कपूर याने म्हटले. एखाद्या चित्रपटाच्या कथेवरून इतका वाद होऊ शकतो, असे मी कधी पाहिले नव्हते. खरंतर चित्रपट लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करीत असतात. त्यामुळे सर्जनशील व्यक्तींना त्याच्या मनातील विचार मांडू दिले पाहिजेत. प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वांनीच आदर केला पाहिजे, असेही तो म्हणाला.