शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शदनाच्या वेळी तान्हाजींच्या भूमिका साकारणार अजय देवगण, उदयभान साकारणार सैफ अली खान, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर, दिग्दर्शक ओम राऊत आणि अजयचा जवळचा मित्र रोहित शेट्टी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सैफ जेव्हा मंचावर आला तेव्हा एक मजेदार प्रश्न त्याला विचारण्यात आला.

मुंबईमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी सैफ मंचावर आला. हसत हसत सैफने नमस्ते म्हणत मंचावर प्रवेश केला. सैफ मंचावर आल्यावर पुढच्या क्षणी पत्रकारांच्या गर्दीमधून त्याला पहिलाच प्रश्न तैमुरबद्दल विचारण्यात आला. या प्रश्नाला सैफनेही हसत हसतच उत्तर दिले. ‘सर तैमुर कैसा हैं?’, असा प्रश्न सैफ मंचावर आल्याआल्या एका पत्रकाराने गर्दीतून विचारला आणि एकच हसू पिकले. सैफने लगेच या प्रश्नाला उत्तर देताना, ‘तैमुर ठीक है’ असं उत्तर दिलं. सैफचे उत्तर ऐकून मंचावर उपस्थित असणाऱ्या अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांनाही हसू लपवता आले नाही.

‘अजयबरोबर त्याच्या शंभराव्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. सर्वात पहिल्यांदा आम्ही कच्चे धागे चित्रपटामध्ये एकत्र काम केलं होतं,’ अशी आठवण सैफने यावेळी बोलताना सांगितली. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

‘तुम्ही दोघे एकत्र काम करत आहात हे समजल्यावर करिनाची पहिली प्रतिक्रिया काय होती?,’ असा सवालही सैफला करण्यात आला. त्यावर बोलताना “तिला अजयचे काम खूप आवडते. त्यामुळे आम्ही दोघे एकत्र काम करणार म्हटल्यावर तिला ठाऊक होतं की आम्ही नेहमीप्रमाणेच मजा करत काम करु,” असं उत्तर सैफने दिलं.