अभिनेता सुशांत सिंह राजपूतला १३ जून रोजी रियासोबत बघितल्याचा दावा करणाऱ्या शेजाऱ्यांविरोधात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सीबीआयकडे तक्रार केली. याप्रकरणी ट्विट करत अभिनेता रितेश देशमुखने रियाला पाठिंबा दिला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआयकडून केली जात आहे.
खोटा दावा करत असल्याचं म्हणत रियाने शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. याबद्दलची बातमी शेअर करत रितेशने ट्विट केलं, ‘सत्यापेक्षा जास्त शक्तीशाली काहीच नसतं. तुला लढण्याची ताकद मिळो.’
More power to you @Tweet2Rhea – Nothing is more powerful than TRUTH. pic.twitter.com/rj8nqYY06E
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 12, 2020
काय आहे प्रकरण?
१३ जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतसोबत बघितल्याचा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थावणी यांनी केला होता. यासंबंधी थावणी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. रियाला सुशांतसोबत बघितल्याचं सांगणाऱ्या थावणी यांच्याकडून सीबीआयनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर “आपण रिया सुशांत प्रत्यक्ष बघितलं नाही, दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकलं,” असं उत्तर थावणी यांनी दिलं. डिंपल थावणी यांचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर सीबीआयनं त्यांना सक्त ताकीद दिली. स्वतःची खात्री झाल्याशिवाय किंवा खरं असल्याशिवाय काहीही बोलू नका, अशा शब्दात सीबीआयनं डिंपल यांना इशारा दिला.