देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला आणि शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली पार हादरुन गेली. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. दरम्यान बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय पटकथा लेखक वरुण ग्रोवरने ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

वरुण ग्रोवरचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले, ‘सगळी चूक ही नेहरू आणि गांधीजी यांची आहे. ना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते ना प्रजासत्ताक दिवस असता’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

जवळपास दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ऐन प्रजासत्ताक दिनी गालबोट लागलं. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी व पोलीस आमने-सामने आल्यानंतर हिंसेचा उद्रेक झाला. यातच शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्याकडे कूच करत किल्ल्यावर ध्वज फडकावला. तर, दुसरीकडे आयकर कार्यालयाच्या ऑफिसजवळ ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय आंदोलक शेतकऱ्यांकडून आठ बसेस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली.

वरुण ग्रोवरने नेटफ्लिक्सवरील सुपरहिट सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ची पटकथा लिहिली आहे. त्यानंतर त्यांनी फॅन, उडता पंजाब, सोनचिडिया या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. वरुण ग्रोवरने ‘पेपर चोर’ हे पुस्तक देखील लिहिले आहे.