बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच तांडव या आगामी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. अली अब्बास जफर निर्मित आणि दिग्दर्शित या सीरिजचा टीझर अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला.टीझरमध्ये या सीरिजला राजकीय पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे. या सीरिजमध्ये सैफ महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या भूमिकेविषयी आणि एकंदरीतच त्याच्या निगेटिव्ह रोलविषयी त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. मला नकारात्मक भूमिका साकारायला आवडतात असं तो म्हणाला आहे.

“तांडव या सीरिजमध्ये सैफ समर प्रताप सिंह ही भूमिका साकारत आहे. तांडवमध्ये मी साकारलेली भूमिका फार रंजक आहे. समर प्रताप सिंह ही व्यक्ती खासकरुन त्याचे राजकीय डाव हे कधीच कोणाला समजत नाही. पण त्याच्या त्याच वर्तनामुळे तो सामर्थ्याशाली आणि तितकाच धोकादायक आहे. मला त्याच्या स्वभावातील हाच गुण आवडला. कारण त्याच्या डोक्यात नेमके कोणते विचार सुरु आहेत हे कोणाचा कधी समजत नाही. ते एक गुढ व्यक्तिमत्व आहे. सध्या मी अशा एका टप्प्यातून पार पडतो जेथे मला अशाच काही रंजक भूमिका साकारायला मिळत आहेत. यात खास करुन माझं लक्ष नकारात्मक भूमिकांकडे जास्त आकर्षित होत आहे”, असं सैफ म्हणतो.

पुढे तो म्हणतो, “नकारात्मक भूमिका असल्या तरीदेखील त्या अत्यंत सुंदररित्या लिहिण्यात आल्या आहेत. काही मुख्य भूमिकांपेक्षाही नकारात्मक भूमिकांना अधिक वजन देण्यात आलं आहे. सध्या मी काही रंजक भूमिकांकडेच लक्ष देतोय. ‘तान्हाजी’ आणि ‘तांडव’ या चित्रपट, सीरिजमध्ये माझी नकारात्मक भूमिका आहे. मात्र, माझं लक्ष याच भूमिकांकडे वेधलं. कधी कधी स्क्रीनवर अशा भूमिका साकारतानादेखील मज्जा येते. सध्या मी या भूमिका करतोय. पण पुढेदेखील याच भूमिका करेन की नाही हे निश्चितपणे सांगू शकत नाही.”

दरम्यान, अॅमेझॉन प्राइमवर तांडव ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. त्यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’च्या टीझरवरून त्या वेबसीरिजच्या कथानकाला राजकीय पार्श्वभूमी आहे, असं दिसत आहे.