सलमान विशेष विमानाने जोधपूरहून मुंबईत दाखल झाला आहे. काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता सलमान खानला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जोधपूर कारागृहातून सलमानची सुटका झाली असून कडेकोड बंदोबस्तात तो जोधपूर विमानतळाकडे रवाना झाला आहे. सलमान विशेष विमानाने जोधपूरहून मुंबईला येणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणात पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता सलमान खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सलमानच्या वकिलांनी ही माहिती दिली. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो बांद्रयातील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.

सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सलमानला जामीन मंजूर केला.

सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच जोधपूर कोर्ट परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. देशाच्या वेगवेगळया भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत. सलमानच्या दोन बहिणी आणि अंगरक्षक शेरा न्यायालयात उपस्थित होते. सलमानला शिक्षा सुनावताच त्याचे वकिल एचएम सारस्वत यांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज सादर केला होता.

१९९८ साली ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानला गेले होते. त्यावेळी सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती. यावेळी सलमानसोबत अन्य कलाकारही होते. पण न्यायालयाने सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांची निर्दोष सुटका केली व एकटया सलमानला दोषी ठरवले. न्यायाधीश देवकुमार खत्री यांनी सलमानला दोषी ठरवले.

काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले होते. आरोपी हा लोकप्रिय कलाकार असून लोक त्यांच्या कृतीचे अनुकरण करतात असे खत्री यांनी आपल्या निकालात म्हटले आहे.

दरम्यान  सलमानला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश देव कुमार खत्री यांची बदली झाली असून त्यांना बढती देण्यात आली. शनिवारी देव कुमार खत्री यांनी न्यायालयात येऊन न्यायाधीश रविंद्र कुमार जोशी यांची भेट घेतली.  राजस्थानच्या न्यायिक यंत्रणेत मोठे बदल झाले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. यामध्ये सलमान खानच्या जामिनावर सुनावणी करणाऱे आणि शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. एकाचवेळी इतक्या न्यायाधीशांची बदली केल्याने शनिवारी सलमान खानच्या जामिनावरील सुनावणीवर टांगती तलवार होती.

काळवीटाच्या शिकारीप्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना बढती मिळाली आहे. बिष्णोई समाजाच्या वकिलांच्या मते, राजस्थानमधील न्यायाधीशांची बदली होणे ही नियमित प्रक्रिया आहे. कारण बहुतांश न्यायाधीशांची बदली ही एप्रिल महिन्यातच होत असते. सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे जोधपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर के जोशी यांचीही बदली करण्यात आली आहे.