बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपला ‘दबंग ३’ हा आगामी चित्रपट घेऊन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते चित्रपटातील नव्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर बहुचर्चित बहुप्रतिक्षीत ‘हुड हुड दबंग’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात सलमान आपल्या दबंग अंदाजात नृत्य करताना दिसत आहे. परंतु सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्यावर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी या गाण्याची यथेच्च खिल्ली उडवली आहे.

‘दबंग ३’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. तसेच या चित्रपटांमध्ये सोनाक्षी सिन्हा हीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षीच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल.

दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता? हे कथानक दाखवले जाणार आहे. सलमानचा चाहता वर्ग पाहता याआधी प्रदर्शित झालेल्या ‘ट्यूबलाईट’, ‘रेस -३’ व ‘भारत’ या तीनही चित्रपटांनी तिकीट बारीवर काही खास कमाल केली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘दबंग -३’ काय कमाल करतो हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल असे म्हटले जात आहे.