अभिनेता संजय दत्त काही वेळासाठी कामापासून ब्रेक घेत आहे. वैद्यकीय उपचारासाठी संजूबाबा हा ब्रेक असून ट्विट करत त्याने याविषयीची माहिती दिली. संजय दत्तला शनिवारी सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय दत्तची करोना चाचणी झाली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.

आणखी वाचा : ‘नव्या आयुष्याची सुरुवात’; अंकिताच्या घरात जुळ्या पाहुण्यांचं आगमन

संजय दत्तने शनिवारी रात्री ट्विट करत त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे दोन-तीन दिवसांत घरी परतणार असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये सांगितलं होतं. संजय दत्तला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.