बॉलिवूड कलाकारांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत बऱ्याचदा चुरस पाहायला मिळते. यातही तिन्हीं खान नेहमीच एकमेकांना धोबीपछाड देताना दिसतात. नुकतेच फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या लोकप्रिय व्यक्तिंच्या यादीत अव्वल स्थान मिळवून दबंग सलमान खानने बॉलिवूड बादशहा शाहरुख खानला खाली खेचले होते. त्यानंतर आता शाहरुखने सोशल मिडियातील लोकप्रियतेमध्ये सलमान खानपेक्षा अधिक लोकप्रियता मिळवून पुन्हा एकदा सलमानपेक्षा अव्वल ठरला आहे. २०१६ या वर्षात ट्विटरवर रंगलेल्या चर्चेमध्ये सर्वाधिक चर्चाही शाहरुख खानची झाली आहे. तर अभिनेत्रींमध्ये बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेल्या देसी गर्ल प्रियांकाने वर्चस्व मिळविले आहे.
मागील वर्षात ट्विटरवर शाहरुख खानविषयी ३६ टक्के चर्चा रंगली होती. त्याच्यानंतर सलमान खान याचा नंबर लागतो. तर तिसऱ्या स्थानावर वरुण धवन, चौथ्या स्थानावर अक्षय कुमार आणि पाचवे स्थान आमिताभ बच्चन यांना मिळाले आहे. ट्विटरवर अधिक चर्चा झालेल्या यादीमध्ये ह्रतिक रोशन सिद्धार्थ मल्होत्रा,करण जोहर अजय देवगण, रणवीर सिंग यांची देखील वर्णी लागली आहे.
अभिनेत्रींच्या यादीमध्ये देसी गर्ल प्रियांका टॉप गियरमध्ये दिसते. ट्विटरवर रंगलेल्या २३ टक्के चर्चेमध्ये तिला स्थान मिळाले आहे. त्यानंतर १८ टक्के चर्चांमध्ये आलियाभट्टभोवती रंगली होती. यांच्याव्यतिरिक्त दीपिका पदुकोण,अनुष्का शर्मा,श्रद्धा कपूर, काजोल, जॅकलीन फर्नांडीस, परिणिती चोप्रा, सोनम कपूर आणि सनी लिओन या अभिनेत्रींनी देखील स्थान मिळविले आहे. २०१६ मध्ये बॉलिवूडमध्ये धमाकेदार ओपनिंग करणाऱ्या सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाविषयी २५ टक्के चर्चा रंगल्याचे पाहायाला मिळाले. तर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाबद्दल १५ टक्के चर्चा रंगली होती.