२०२१ हे नवीन वर्ष अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरत आहे. या नव्या वर्षात काही कलाकार विवाहबंधनात बांधले गेले आहेत. तर काही कलाकारांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, हृतिक रोशन, जान्हवी कपूर या सेलिब्रिटींनी घर खरेदी केल्याची चर्चा होती. त्यांच्या नंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नवीन घर खरेदी केलं आहे.
‘पिंकव्हिला’नुसार, सोनाक्षीने मुंबईतील वांद्रे येथे ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केलं आहे. वांद्र्यातील Bandra Reclamation या भागात सोनाक्षीने तिचं नवीन घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे नव्या वर्षात माझं स्वप्न पूर्ण झालं असं सोनाक्षीने म्हटलं आहे.
View this post on Instagram
“जेव्हापासून मी करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मी एकच स्वप्न पाहिलं होतं. वयाच्या ३० व्या वर्षापर्यंत मला माझं हक्काचं, स्वत:चं घर खरेदी करायचं होतं. मला माझ्या कष्टाच्याच पैशांमध्ये हे घर खरेदी करायचं होतं. तसं मला बराच वेळ लागला आहे. पण अखेरकार माझं स्वप्न साकार झालं आहे”, असं सोनाक्षी म्हणाली.
पुढे ती म्हणते, “मी नवीन घर जरी खरेदी केलं असलं तरीदेखील मी माझ्या आई-वडिलांसोबतच राहणार आहे. मला आई-वडिलांसोबत रहायला जास्त आवडतं. जुहूतील घर सोडून जाण्याचा माझा कोणताच विचार नाही. मला केवळ माझं हक्काचं घर खरेदी करायचं होतं. ते मी केलं आहे आणि हीच माझी खरी गुंतवणूक आहे.” दरम्यान, सोनाक्षी लवकरच ‘भूज :द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनता अजय देवगण तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.