अभिषेक बच्चन याच्या मालकीची जयपूर पिंक पँथर्सवर आधारित ‘सन्स ऑफ द सॉईल: जयपूर पिंक पँथर्स’ ही डॉक्युसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅमेझॉन ओरिजनल असलेल्या या सीरिजमधून लहान शहरातून आलेल्या कबड्डीपटूंचा प्रवास मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये एका मराठमोळ्या कबड्डीपटूची वर्णी लागली असून त्याचा जीवनप्रवास थोडक्यात उलगडण्यात येणार आहे.
ही डॉक्युसीरिज ४ डिसेंबरपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमधून महाराष्ट्राचा एक प्रामाणिक कबड्डीपटू आणि रेडर निलेश साळुंखे याचा प्रवास थोडक्यात उलगडण्यात येणार आहे. कबड्डीसाठी त्याने घेतलेली मेहनत आणि या खेळामुळे त्याचं बदलेलं आयुष्य यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
“मला अगदी शून्यापासून सुरुवात करावी लागली. मी आणि माझं कुटुंब एका लहानशा घरात राहत होतो. खरं तर आज मी जिथे पोहोचलोय तो प्रवास फार सोपा नव्हता. या ठिकाणी पोहोचणं माझ्यासाठी फार कठीण होतं. प्रचंड मेहनत आणि प्रशिक्षकांनी मला दिलेली साथ यामुळे आज हे सगळं शक्य झालंय”, असं निलेश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “योग्य आहार घेण्यासाठीदेखील माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मात्र, माझ्या प्रशिक्षकांनी मला खूप मदत केली. प्रो कबड्डीमध्ये आल्यानंतर मी नवीन घर विकत घेतले. मी इतर संघात असताना मला नेहमी जयपूर पिंक पँथर्सकडून खेळण्याची इच्छा होती आणि मला मागच्या वर्षी ही संधी मिळाली. मी चार वेळा नॅशनल खेळलो आहे आणि मला जेपीपीकडून खेळणे सुरू ठेवण्याची इच्छा आहे. माझा या मालिकेतील प्रवास यामध्ये बघायला मिळेल.”
दरम्यान,या मालिकेची निर्मिती बीबीसी स्टुडिओ इंडियाने केली असून बाफटा स्कॉटलंडचा दोन वेळा विजेता राहिलेल्या अॅलेक्स गेल दिग्दर्शित ही मालिका प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील जयपूर पिंक पँथर्सचा प्रेरणादायक प्रवास चित्रित करीत आहे. अमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘सन्स ऑफ द सॉईलः जयपूर पिंक पॅंथर्स’चा प्रीमियर ४ डिसेंबरपासून प्राइम व्हिडिओवर २०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 30, 2020 2:19 pm