लॉकडाउनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. काही लोकांकडे काम नाहीत तर काही लोकांना लॉकडाउनमुळे कामाला जाता आले नाही. अनेक बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील कलाकरांचा देखील याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. अशातच सोनू सूदने एका छोट्या पडद्यावरील कलाकाराला मदत केल्याचे समोर आले आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बेगूसराय’ या मालिकेतील अभिनेते राजेश करीर यांच्यावर आर्थिक संकट कोसळले होते. याच मालिकेत त्यांच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीने त्यांना मदत केली आहे. त्यानंतर त्यांना आता सोनू सूदने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात राजेश यांनी ‘स्पॉटबॉय’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोनू सूदने मदत केल्याचे म्हटले आहे.

‘बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आज सकाळी मला फोन केला होता आणि त्याने मला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे असे विचारले. त्यानंतर त्यांनी मी पंजाबचा असल्यामुळे मला पंजाबला परत जायचे आहे का? असा प्रश्न विचारला. पण मी त्यांना सध्याची परिस्थिती पाहता माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी इथे राहणे योग्य असल्याचे सांगितले. त्यावर त्याने मला जेव्हा कधी पंजाबला पुन्हा जायचे असेल तेव्हा दोन दिवस आधी कळवण्यास सांगितले. जेणेकरुन ट्रान्सपोर्टची सोय करता येईल’ असे त्यांनी म्हटले.

राजेश करीर यांनी ३१ मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे म्हटले होते. पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘कृपया माझी मदत करा. मला तुमच्या मदतीची गरज आहे. सध्या माझी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. मला काम मिळेल की नाही काहीच माहिती नाही. माझे जीवन ठप्प झाले आहे’ असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले होते.