लॉकडाउनच्या काळात गरीब स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद ‘देवदूत’ बनून आला. या मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याची व्यवस्था सोनू सूदने केली. प्रत्येक मजुराशी तो स्वत: संपर्क साधून त्याची मदत करत होता. बस, रेल्वे, विमान या सगळ्यांची सोय करत त्याने गरजूंना इच्छित स्थळी पोहोचवलं आहे. हातावर पोट असणाऱ्या या मजुरांसाठी त्याने आता रोजगारीचं अॅपसुद्धा लाँच केला आहे. परोपकाराचं काम करणाऱ्या या सोनू सूदने आता करोनाची लससुद्धा बनवावी अशी इच्छा एका चाहत्याने ट्विटरवर व्यक्त केली. यावर सोनू सूदने त्याला भन्नाट उत्तर दिलं आहे.

सोनू सूदचा फोटो पोस्ट करत या चाहत्याने ट्विटरवर लिहिलं, ‘आता ती वेळ आली आहे, करोनाची लस बनवण्याची जबाबदारीसुद्धा सोनू सूदवर सोपवायला पाहिजे.’ यावर हात जोडणारा इमोजी पोस्ट करत सोनूने लिहिलं, ‘हाहाहा… एवढी मोठी जबाबदारी नको देऊस भावा.’

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मधील विनोदवीर आहेत इतक्या संपत्तीचे मालक

सोनू सूदच्या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तो ज्याप्रकारे मजुरांना उत्तर देत आहे, त्यांची मदत करत आहे हे पाहून सामान्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. प्रत्येक मजुर त्याच्या घरी सुखरुप पोहोचेपर्यंत हे काम सुरू ठेवणार असल्याचं सोनू सूदने सांगितलं.