21 October 2020

News Flash

BLOG : The Family Man : गोफ नव्हे गुंता!

मनोज वाजपेयीनं या वेबसीरिजमधली मध्यवर्ती भूमिका साकारली आहे

‘The Family Man’ ही वेबसीरिज तीन दिवसांपूर्वीच ‘Amazon Prime’ वर रिलिज झाली. ‘रोज घडणाऱ्या सत्य घटनांवर प्रेरित’ असं या सीरिजचं एका ओळीतलं वर्णन. मनोज वाजपेयी हा ‘फॅमिली मॅन’ आहे. त्याला पत्नी, दोन मुलं आहेत. मात्र त्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेत काम करणं हे गूढ आहे. कारण त्याच्या पत्नीला त्याची ओझरती कल्पना आहे. मुलांना माहित नाही. दुसरीकडे त्याचं रोजचं धकाधकीचं मुंबईतलं आयुष्य सुरु आहे. या सगळ्यात एक अलर्ट मिळतो. एक दहशतवादी मिशन, मग ते मिशन हाणून पाडण्यासाठी अर्थातच आपला हिरो म्हणजे मनोज वाजपेयी  काय करतो? त्यात त्याला कुणाची साथ लाभते? या सगळ्यावर ही दहा एपिसोडची वेबसीरिज उभी आहे. मनोज वाजपेयीने श्रीकांत तिवारी हे राष्ट्रीय तपास यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं पात्र साकारलं आहे.

‘द फॅमिली मॅन’, ‘स्लीपर्स’, ‘अँटी नॅशनल’, ‘पॅट्रिओट्स’, ‘परिह’, ‘डान्स ऑफ डेथ’, ‘पॅरेडाईज’, ‘अॅक्ट ऑफ वॉर’, ‘फाईटिंग डर्टी’ आणि ‘द बॉम्ब’ असे दहा एपिसोड आहेत. प्रत्येक भागाच्या नावाप्रमाणे त्यातली कथा घडते, उलगडत जाते. दिल्लीवर असा हल्ला करण्याचा प्लान आहे जो २६/११ पेक्षाही भयंकर असेल. नेमका कसला हल्ला होणार आहे? प्लान कुठे कुठे शिजलाय? पाकिस्तान, आयएसआय यांच्या यात भूमिका काय आहेत? एका महाविद्यालयाला कसं बदनाम केलं जातं? पोलिसांचा या महाविद्यालयातील मुस्लीम मुलांकडे पाहण्याचा समज काय असतो? श्रीकांत तिवारी या सगळ्याचा छडा कसा लावतो? त्याची काश्मीर, बलुचिस्तानची लिंक कशी शोधून काढतो? हे सगळं काही उत्कंठावर्धक झालं आहे. एक नवरा, एक बाप म्हणून वावरणारा श्रीकांत, एनआयएचा अधिकारी म्हणून वापरणारा श्रीकांत हे उभारताना मनोज वाजपेयीच्या अभिनयाचा कस लागला आहे. ही वेबसीरिज पूर्णतः श्रीकांत तिवारीभोवती फिरते. त्याच्या पाठोपाठ सुंदर अभिनय केला आहे तो ‘मुसा’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नीरज माधव याने. मुसा ही भूमिका त्याने ज्या ताकदीने साकारली आहे त्याला तोड नाही. ही वेब सीरिज जेवढी श्रीकांत तिवारीची आहे तेवढीच या मुसाचीही. मुसाची व्यक्तिरेखा का महत्त्वाची आहे त्याचं उत्तरही एक एक भागात मिळत जातं.

पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बोटीवर असलेल्या तीन अतिरेक्यांना तटरक्षक दलाचे जवान घेरतात. त्यांना अटकही केली जाते. या तीन दहशतवाद्यांना फोर्स वन च्या ताब्यात त्यांना दिलं जातं. त्यांच्याकडून एनआयएकडे या तिघांचा ताबा येणार असतो. त्या दरम्यान हे तीन दहशतवादी पळ काढतात. मुंबईतल्या रस्त्यांवर हा प्रसंग साकारण्यात आला आहे. त्यानंतर काय घडतं? या तीन दहशतवाद्यांमधलाच कुणी मास्टरमाईंड असतो का? दिल्ली उडवण्याचा कट काय असतो? या सगळ्याची उत्तरं मिळत जातात. धक्का तंत्राचाही चांगला वापर यामध्येही करण्यात आला आहे.

प्रियामणी या दाक्षिणात्य अभिनेत्रीने मनोज वाजपेयीच्या पत्नीचं म्हणजेच सुचित्राचं पात्र साकारलं आहे. तिने साकारलेली मॉडर्न आई, पत्नी सुंदर जमली आहे. तिच्या मित्राच्या भूमिकेत आपला मराठमोळा शरद केळकर आहे, अरविंद हे पात्र शरद केळकरने साकारलं आहे. या दोघांचेही काही प्रसंग उत्तम झाले आहेत. याशिवाय दलीप ताहील (कुलकर्णी), गुल पनाग (सलोनी), दर्शन कुमार (समीर), शरीब हाश्मि (जे. के. तलपडे), किशोर कुमार जी. (पाशा) या व्यक्तिरेखाही चांगल्या वठल्या आहेत. विशेष उल्लेख करावा लागेल तो पाशा या व्यक्तिरेखेचा फोर्स वनच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो चपखल बसला आहे.

या सगळ्या सीरिजमधून मॉब लिंचिंग, गोरक्षा, बीफ, मुस्लिम द्वेष, १५ लाख रुपयांचं मिळालेलं आश्वासन, काश्मीर प्रश्न, तिथे धगधगणारं वास्तव, सरकारच्या काही योजना, वडा-पाव विक्रेते आणि त्याची गाडी असलेल्या ठिकाणी कट्ट्यावर चालणारी देशाची बदनामी, मुंबईतली गर्दी, लोकलमधली गर्दी या सगळ्यांवरही मार्मिक भाष्य करण्यात आलं आहे.

इतकं सगळं आहे तरीही जेव्हा एक एक रहस्यं समोर येत जातात आणि उलगडा होत जातो तसं फक्कड जमलेल्या बेताचा लगदा व्हायला सुरुवात होते. सलोनी अर्थात गुल पनाग या अभिनेत्रीने साकारलेलं पात्र या सीरिजमध्ये का आहे हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. शिवाय मनोज वाजपेयी हा जरी एनआयएचा अधिकारी असला तरीही तो काश्मीरला जेव्हा जातो तेव्हा फक्त तो त्याच्या वरिष्ठाला सांगतो आणि दुसऱ्या दिवशी बलुचिस्तानात जातो. तिथे जाऊन त्याची युक्ती लढवतो आणि माहिती काढतो हे पाहताना ठीक वाटत असलं तरीही बुद्धीला पटत नाही. हॉस्पिटलमध्ये बोल्ड सीन दाखवण्यात आला आहे त्याची गरज हा कथानकाचा भाग होती की चर्चा व्हावी ही होती? हेदेखील कळत नाही. अरविंद आणि सुचित्रा यांच्यातलं नातं काय ? हे सांगतानाही दिग्दर्शक गोंधळून गेला आहे असं वाटतं. ते चांगले मित्र असतात, आपल्याबाबत लोक चर्चा करु लागले आहेत हे स्वतः अरविंद सुचित्राला सांगतो. एक-दोनदा तर श्रीकांतला तसा संशय येतो. मात्र या दोघांमध्ये असं काय घडतं की ते अचानक संवाद साधणं बंद करतात? याचं उत्तर मिळत नाही.

साजिद हे एक पात्र देखील या सीरिजमध्ये आहे. तो जे काही करत असतो त्यात तो यशस्वी होतच असतो. त्याचं शेवटी काय होतं? ते उत्तर मिळत नाही. सलोनी आणि श्रीकांत यांच्यातला भूतकाळ याबद्दल पाहताना निर्माण झालेला प्रश्नही अनुत्तरीतच राहतो. या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं न मिळता सीरिजचा शेवट होतो.  उत्तम कथा, चांगली हाताळणी, चांगला विषय, चांगली मांडणी असा सगळा गोफ बांधायचा खूप चांगला प्रयत्न केला आहे, मात्र दुर्दैवाने या सगळ्याचा गुंता होऊन बसला आहे असंच सरतेशेवटी म्हणावं लागतं.

समीर चंद्रकांत जावळे

sameer.jawale@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 7:08 pm

Web Title: special blog on amazon prime web series the family man scj 81
Next Stories
1 Blog: आपली ऑस्करला एण्ट्री तर असते, पुढे काय?
2 BLOG : भाजपा-शिवसेनेची कलगीतुऱ्यात रंगलेली युती
3 खड्डामुक्त रस्ते: ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ मिळवणाऱ्या डॉ. विजय जोशींची आपण मदत घेणार का?
Just Now!
X