दिल्लीतील मालविया नगर परिसरात एक छोटासा ढाबा चालवणारे ८० वर्षीय कांता प्रसाद यांच्या मदतीला आज संपूर्ण देश पुढे सरसावला आहे. करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून काहीच कमाई होत नसल्याचं सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांना मदत मिळू लागली. ‘बाबा का ढाबा’वर आता लोकांनी खच्चून गर्दी केली असून कांता प्रसाद यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सोशल मीडियाच्या ताकदीने केलंय. विशेष म्हणजे ‘बाबा का ढाबा’ची मदत करण्यात सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत. सुनील शेट्टी, स्वरा भास्कर, रवीना टंडन अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी आवाहन केलं आहे.

क्रिकेटर आर. अश्विन, अभिनेता रणदीप हुडा, सोनम कपूर यांनीसुद्धा या वयोवृद्ध जोडप्याची मदत केली आहे. रणदीप हुडाने ‘बाबा का ढाबा’चा पत्ता ट्विटरवर लिहित लोकांना तिथे जाऊन मदत करण्याची विनंती केली. तर ”बाबा का ढाबा’. दिल्लीवालो दिल दिखाओ. जो कोणी इथे येऊन जेवेल त्यांनी मला एक फोटो पाठवा. तो फोटो मी सोशल मीडियावर शेअर करेन. सोबतच तुमच्यासाठी एक खास मेसेजदेखील पाठवेन”, असं आवाहन रविनाने नेटकऱ्यांना केलं आहे.

लोकांचा प्रतिसाद पाहून कांता प्रसाद यांनी कृतज्ञता व आनंद व्यक्त केला. “आज संपूर्ण भारत आमच्या सोबत उभा आहे असं वाटतंय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.