हॉलीवूडमध्ये एका मराठी कलाकाराने नाव कमावले आहे. त्याला तिथे सर्वसामान्य प्रेक्षक ओळखतो, नव्हे त्याच्या स्वाक्षरीसाठी गर्दीही करतो, असे सांगितले तर आपला विश्वास बसत नाही. मात्र, गेली पंचवीस वर्षे लॉस एंजेलिसमध्ये राहून ‘इंटेल’, ‘आयबीएम’, ‘एचपी’सारख्या मोठमोठय़ा कंपन्यांच्या पन्नासएक जाहिरातींमधून झळकलेल्या अभिनेता सुनील नारकर याच्याबाबतीत हे सत्य आहे. आपण त्यांना ‘इंटेल’च्या जाहिरातीतील यूएसबीचे जनक अजय भट्ट यांच्या भूमिके त पाहिलेले आहे. या जाहिरातीमुळे इथेही प्रसिद्ध झालेला हा हॉलीवूडचा मराठी कलाकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करणार आहे.
गेली अनेक वर्ष हॉलीवूडमध्ये जाहिराती, मालिका आणि चित्रपटांमधून काम करत असतानाच मराठीशी आपली नाळ सुनील नारकर यांनी घट्ट जोडून ठेवली होती. रुईया महाविद्यालयात शिकत असताना घेतलेली नाटकांची तालीम त्यांनी अमेरिकेत नोकरीनिमित्त गेल्यानंतर महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून कामी आणली. ‘नाटक डॉट कॉम’सारख्या संकेतस्थळाच्या मदतीने त्यांनी मराठी कलाकारांना अमेरिकेत आणून त्यांची नाटके दाखवण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. त्यावेळी अनेक मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक भेटायचे आणि तुमच्याबरोबर मराठी चित्रपट करायचा आहे, असेही म्हणायचे. मात्र, माझा चेहरा भारतात परिचित नसल्याने हा योग काही जुळून आला नव्हता, असे सुनील नारकर यांनी ‘वृत्तांत’ला सांगितले. दोन वर्षांपूर्वी निर्माते देवदत्त कपाडिया यांचा मुलगा मृणाल याने आगामी मराठी चित्रपटात काम करूयात, असे सांगितले होते. त्यावेळी तो ‘गोळाबेरीज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तिथे आला होता. त्याने मिशिगनमध्ये शिकत असताना माझे तिथले काम पाहिले होते. त्यामुळे, मराठीतही मी चांगले काम करेन, असा विश्वास त्याला होता. त्यातूनच ‘धुरंधर भाटवडेकर’ हा चित्रपट माझ्याकडे आला, असे नारकर यांनी सांगितले.
क्षितिज झारापकर दिग्दर्शित ‘धुरंधर भाटवडेकर’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि मोहन जोशी यांच्याबरोबर सुनील नारकर काम करणार आहेत. वृद्धाश्रमातील दोन वृद्ध आणि त्यांच्या जुगलबंदीत अडकलेला एक डॉक्टर अशी या चित्रपटाची कथा असून सुनील नारकर यांनी यात डॉ. पाटकरांची भूमिका के ली आहे.
‘नेस्ले’च्या ‘बटर फिंगर’ या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी त्यांनी पहिल्यांदा ऑडिशन दिली आणि ती सगळ्यात मोठी जाहिरात त्यांना मिळाली. त्यानंतर तीन-चार वर्षांत त्यांनी जाहिरातींच्या माध्यमातून आपले बस्तान हॉलीवूडमध्ये बसवले. २००८मध्ये अमेरिकेत प्राईम टाइममध्ये पाहिला जाणारा ‘नॅशनल बिंगो नाइट’ या शोचे सूत्रसंचालन करण्याची संधी त्यांना मिळाली. अमेरिकन शोचे सूत्रसंचालन करणारा मी पहिला भारतीय आहे, असे सांगणाऱ्या सुनील नारकरांना या शोने तिथे घरघरात लोकप्रिय केले आहे. आत्तापर्यंत नऊ हॉलीवूड मालिका, तीन चित्रपट आणि पन्नास जाहिरातींमधून काम केल्यानंतर आता आपल्या देशात तेही मायबोलीत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद झाल्याचे सांगितले.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ