सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी केंद्राकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल करत तपास सुरु केला आहे. बिहार सरकारने विनंती केल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सर्वात आधी एफआयआर दाखल करणाऱ्या बिहार पोलिसांच्या आपण संपर्कात असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बिहार पोलिसांनी अभिनेत्री आणि कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सीबीआयने एकूण सहा जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, सॅम्यूअल मिरांडा, श्रुती मोदी यांचा समावेश आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा आणि विजय मल्ल्याविरोधातील बँक घोटाळ्याचा तपास करणारं विशेष तपास पथक सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे”.

सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं अशी वारंवार मागणी केली जात होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. महाराष्ट्र सरकारने मात्र मुंबई पोलीस योग्यप्रकारे तपास करत असून बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही मागणी केली जात असल्याचा आरोप केला होता. सोबतच सीबीआयकडे तपास देण्यास विरोध केला होता.

सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे पोलीस तक्रार दाखल केल्याने बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले होते. यावेळी मुंबई पोलिसांनी बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना होम क्वारंटाइन केल्यावरुनही टीका सुरु आहे. दरम्यान याप्रकऱणी बिहार पोलीस कायदेशीर मार्गाने मुंबई पोलिसांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती बिहारचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

“आयपीएस विनय तिवारी यांना अद्यापही क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना घरकैदेत ठेवल्यासारखी परिस्थिती आहे. महाधिवक्तांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे,” असं डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. “बिहारच्या पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय अव्यवहार्य आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याप्रकरणी आपलं निरीक्षण नोंदवलं आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सुशांत सिंह मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण होतं यावरुन अनेक दावे केले जात असून त्यासंबंधी तपास सुरु आहे.