अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी त्याची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुशांतच्या वडिलांकडून रियावर फसवणूक आणि मानसिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मौन बाळगलेली रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच समोर आली आहे. रियाच्या वकिलांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये रिया सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त करत आहे.

रिया चक्रवर्तीने म्हटलं आहे की, “मला देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय मिळेल असा विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझ्याबद्दल भयानक गोष्टी बोलल्या जात असल्या तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माझ्या वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी त्यावर कोणतंही भाष्य करणार नाही”. रिया चक्रवर्तीने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना नियुक्त केलं आहे. त्यांच्याकडूनच हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

व्हिडीओच्या शेवटी रियाने सत्यमेव जयते…सत्याचा विजय होईल असं म्हटलं आहे.

सुशांतच्या वडिलांकडून करण्यात आलेल्या आरोपांची बिहार पोलीस चौकशी करत असून त्यासाठी ते मुंबईतदेखील दाखल झाले आहेत. याशिवाय आर्थिक व्यवहाराचे आरोप असल्याने ईडीकडूनही चौकशी सुरु झाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी काय आरोप केले आहेत ?
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास आणि धमक्या दिल्याचाही आरोप आहे. तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखलं. आपलं ऐकलं नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचं सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपलं ऐकत नसल्याचं आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं लक्षात आलं तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”.

सुशांत सिंह प्रकरणात रियाने प्रसिद्ध वकिलाला केलं नियुक्त, एका दिवसाची फी ऐकून थक्क व्हाल

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “रिया सुशांतसोबत एकत्र राहत होती. आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी तिने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रं सोबत नेली. यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. सुशांतने आपल्या बहिणीला फोन करुन रियापासून धोका असल्याचं सांगितलं होतं. रियाने आपल्याला धमकावलं असून वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करण्याची धमकी दिल्याचं सुशांतने आपल्या बहिणीला सांगितलं होतं”.

“सुशांतची मॅनेजर दिशाने आत्महत्या केल्यानंतर मीडियामधील बातम्यांमुळे सुशांतला भीती वाटू लागली होती. त्याने रियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिने नंबर ब्लॉक केला होता. दिशाच्या आत्महत्येसाठी रिया आपल्याला जबाबदार ठरवेल अशी भीती सुशांतला होती,” असंही त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे.